मुंबई : तातडीने दिल्लीला रवाना झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा केली. मंत्रिमंडळातील भाजपाच्या नव्या चेहऱ्यांची नावेही या दोघांच्या भेटीत निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. संभाजी पाटील निलंगेकर, जयकुमार रावळ, भाऊसाहेब फुंडकर/डॉॅ. संजय कुटे, सुभाष देशमुख, प्रशांत ठाकूर/रवींद्र चव्हाण अशी नावे चर्चेत आहेत. मात्र, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांची अचानकपणे केंद्रीय मंत्रिमंडळात लागलेली वर्णी आणि डॉ. विकास महात्मे यांना दिलेली राज्यसभेची खासदारकी या अलीकडील घटना बघता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपाकडून काही धक्कादायक नावेदेखील येऊ शकतात. मित्रपक्षांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना सामावून घेतले जाईल. मात्र, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना स्थान नसेल. रिपाइंचे रामदास आठवले हे केंद्रीय मंत्री होत असल्याने त्यांच्या पक्षाला राज्यात मंत्रिपद दिले जाणार नाही. पक्षाला एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाईल, असे समजते. (विशेष प्रतिनिधी)सन्मानावर अडले घोडे...शिवसेनेने राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे मागितली आहेत. ती सन्मानाने द्यावीत ही आमची भूमिका असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. विस्तारात शिवसेनेच्या सहभागाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची याआधीच प्राथमिक चर्चा झाली आहे. शिवसेनेला दोन राज्यमंत्रिपदे देण्यास भाजपा राजी आहे, पण जादाचे कॅबिनेट मंत्रिपद देण्यास उत्सुक नसल्याचे समजते.
राज्यातही होणार मंत्रिमंडळ विस्तार!
By admin | Published: July 05, 2016 4:36 AM