ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. १६ - कृषी मंत्रालयाचे नाव बदलून खरोखरच शेतक-यांचे भलं होणार आहे का असा खोचक सवाल शरद पवार यांनी मोदी सरकारला विचारला आहे. दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटूनही त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौ-यावर असून या दौ-या दरम्यान त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी मंत्रालयाचे नामकरण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालस असे केले होते. यावरुन पवारांनी मोदींवर टीका केली. कृत्रिम पावसाचा काहीच उपयोग होत नसून आता पाऊस झाला नाही तर गंभीर प्रश्न निर्माण होईल. शेतीचे उत्पादनही घटेल, अशा परिस्थितीत सरकारने महिनाभरात मदत जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली. शेतक-यांना वर्षभर पुरेल एवढे काम द्यावे असेही त्यांनी सांगितले. कर्ज पुनर्गठनासंदर्भात असतील अर्थमंत्र्यांची भेट घेऊ, पंतप्रधान भारतात असतील तर त्यांचीही भेट घेऊ असा चिमटाही त्यांनी काढला. सर्व दुष्काळी भागाबाबत वेगळा विचार करण्याची गरज असून मराठवाडा, विदर्भ, सांगली, आटपाटी अशा प्रत्येक भागात वेगळी स्थिती आहे, पाऊस कमी तिथे पाणी आणायचं कुठून असा प्रश्नही त्यांनी विचारला. माणसं व पशूधन जगवण्याची चिंता आता सरकारनेच करावी असेही त्यांनी म्हटले आहे.