मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्याकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळून लावत त्यांच्या १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, किरीट सोमय्या यांनी संपूर्ण माहिती घेऊन भाष्य करावं. त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. सोमय्यांच्या आरोपाने भाजपाची प्रतिमा मलिन होतेय. किरीट सोमय्यांनी हवी तिथं खुशाल चौकशी करावी. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपाकडून वारंवार आरोप लावले जात आहेत. सोमय्यांना कारखान्याचं नाव सुद्धा वाचता येत नाही. आयकर विभागाने दोन वर्षापूर्वीच चौकशी केली आहे. चंद्रकांत पाटलांनी(BJP Chandrakant Patil) दिलेल्या माहितीच्या आधारे सोमय्या आरोप करतात. त्यांनी कोल्हापूरात येऊन माहिती घ्यावी असा टोला मुश्रीफांनी लगावला.
ठाकरे सरकारमधील 'हा' मंत्री अडचणीत?; मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभाग असल्याचा दावा
तसेच किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपामुळे कोल्हापुरात भाजपाचा भुईसपाट होणार हे निश्चित आहे. सोमय्यांनी कोल्हापूरात येऊन ८ दिवस राहावं. त्यानंतर त्यांचे मन परिवर्तन होईल. रस्ते घोटाळ्याचा आरोप असणारे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहे. अमित शाह यांच्यामुळेच चंद्रकांत पाटलांना मंत्रिपद मिळालं. बांधकाम खातं, महसूल खातं, सहकार खातं अमित शाह यांच्यामुळेच चंद्रकांत पाटलांना मिळालं. किरीट सोमय्यांना काहीही माहिती नाही, कुठलेही पुरावे नसताना आरोप केल्यामुळे येत्या २ आठवड्यात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushriff) यांनी दिला.
प्रविण दरेकर यांनी शांत राहावं, संयम पाळावा
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी कुठलेही आरोप करताना टीका करताना जरा शांत राहावं, संयम पाळावा असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी दरेकरांना लगावला.
किरीट सोमय्यांचा आरोप काय?
किरीट सोमय्या(BJP Kirit Somaiya) यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँन्ड्रिंग व्यवहार केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते आहे असं त्यांनी सांगितले.