पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे स्वामित्व योजना मालमत्ता कार्डाचे वितरण करणार असून, या कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक हे पालघरमध्ये येणार असल्याने पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे चित्र आहे. यापूर्वीही पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यात अंतर्भूत असताना गणेश नाईक हे दोन वेळा पालघरचे पालकमंत्री राहिले आहेत.
जमिनीवर कायदेशीर अधिकार मिळवून देणाऱ्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशभरात ५७ लाख प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याद्वारे जमिनीची मालकी ठरवून एक प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. या कार्ड वितरणाच्या कामासाठी भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांना पालघरमध्ये पाठविण्यात आल्याने पालघर जिल्ह्याचे पुढील पालकमंत्री हे गणेश नाईक असतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.