मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाहेर शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्याची अनुमती देण्याच्या निर्णयावर राज्य शासन ठाम असून या निर्णयाविरुद्ध बंद पुकारणाऱ्या बाजार समित्या आणि व्याापाऱ्यांवर कारवाईचा इशारा सरकारने आज दिला. मंत्रालयात या संदर्भात झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात झालेल्या या बैठकांना नवे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, खा.राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नवी मुंबई घाऊक व्यापारी सेनेचे अध्यक्ष सर्जेराव यादव आदी उपस्थित होते. अडतीच्या जोखडातून शेतकऱ्यांची मुक्तता करणारा आणि शेतकऱ्यांना शेतमालाची थेट विक्री करण्यास अनुमती देणारा हा निर्णय अत्यंत दूरगामी असून त्याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हे करताना आज बाजार समित्यांमध्ये व्यापार करणाऱ्यांना बाहेरही त्याच परवान्यावर आणि बँक हमीवर व्यापार करण्याची अनुमती असेल, असे नवे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या जीवावर उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेणे बरोबर नाही, असेही देशमुख यांनी सुनावले.बाजार समित्यांच्या बाहेरील व्यापारावर सरकारने कोणतेही बंधन घातलेले नाही. तसेच बाजार समित्यांतील व्यापारही बंधनमुक्त करावा. बाजार समित्यांमध्ये लेव्ही, माथाडींचा बोजा आमच्यावर टाकू नये, अशी मागणी व्यापाऱ्यांचे नेते सर्जेराव यादव यांनी बैठकीत केली. (विशेष प्रतिनिधी)
‘त्या’ व्यापाऱ्यांवर होणार कारवाई!
By admin | Published: July 12, 2016 4:04 AM