पुणे : प्रवासीवाढीसाठी पीएमपीएमएलने सुरू केलेल्या दैनंदिन सवलतीच्या पासचा गैरवापर रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यात आली आहेत. हा पासचा गैरवापर होताना आढळल्यास आता थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. तसेच हे प्रकार रोखण्यासाठी या पुढे पासवर अहस्तांतरणीय असा शिक्का मारण्यासही सुरुवात करण्यात आली आहे.दोन्ही महापालिकांमधील प्रवासीवाढीसाठी पीएमपी प्रशासनाकडून दैनंदिन ७० रुपयांचा असलेला पास ५० रुपयांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याला प्रवाशांचा भरघोस प्रतिसद मिळत असून सवलतीपूर्वी दर दिवसाला अवघे ३ हजार पास विकले जात होते. हा आकडा सवलतीनंतर सुमारे ३० हजारांच्या घरात पोहोचला आहे. मात्र, त्याच वेळी काही वाहक, तसेच प्रवाशांकडून या पासचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच या पासवर अहस्तांतरणीय असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे अशी पासची विक्री करताना कोणी आढळल्यास विक्री करणारा आणि विकत घेणारा या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
...तर भोगावा लागेल कारावास
By admin | Published: September 20, 2016 1:30 AM