Mahadev Jankar ( Marathi News ) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी काल महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीसोबतच कायम राहण्याचा निर्णय जाहीर केला. नाराज असलेल्या जानकर यांनी मागील काही दिवसांत अनेकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाठीभेटीही घेतल्या होत्या. तसंच शरद पवार यांनी मला माढा लोकसभा मतदारसंघाबाबत आश्वासन दिलं असल्याचं सांगत त्यांनी पवारांचे आभार मानले होते. त्यामुळे जानकर हे लवकरच महाविकास आघाडीत सामील होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र जानकर यांनी यू-टर्न घेत महायुतीसोबत असल्याचे काल जाहीर केले. महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा सोडण्यात आली आहे. मात्र ती जागा नेमकी कोणती असणार, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जानकर नक्की कुठून लढणार, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात असून ते बारामतीतून कमळ चिन्हावरही लढू शकतात, असंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर जानकर यांनी चिन्हाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे.
तुम्ही कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार का, असा प्रश्न महादेव जानकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना जानकर म्हणाले की, "माझा एक आमदार आहे, तो रासपच्या चिन्हावर आहे. मी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली होती, तीही माझ्याच चिन्हावर लढवली होती. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूकही मी रासपच्याच चिन्हावर लढणार," असा खुलासा जानकर यांनी केला आहे.
दरम्यान, महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा माढा, परभणी आणि बारामती या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी सुरू आहे. त्यामुळे ते नक्की कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कसा झाला जानकरांचा महायुतीत समावेश?
महादेव जानकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी काल एक संयुक्त निवेदन जारी केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असं महादेव बैठकीत सांगितलं. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं आहे," असं महायुतीच्या या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. या निवदेनाच्या खाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेव जानकर यांचीही सही आहे.