- बाळकृष्ण परब येत्या काही दिवसांमध्ये मनसे आपला ध्वज आणि राजकीय भूमिकेबाबत मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे. राज्यातील सध्याच्या बदललेल्या सत्तासमीकरणांचा लाभ घेऊन पक्षाचे मुळापासून नवनिर्माण करण्याची योजना राज ठाकरे यांनी आखली आहे. त्याचाच भाग म्हणून मनसेच्या ध्वजाचा रंग आता पूर्णपणे बदलणार असून, भगव्या रंगातील मनसेच्या नव्या ध्वजाचे अनावरण लवकरच होण्याची शक्यता आहे. तसेच भगव्या ध्वजासोबतच राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष आक्रमक हिंदुत्वाची कास पकडण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. पण ही हिंदुत्वाची वाट मनसेला सत्तेच्या 'राज'मार्गावर आणणार? का असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचे समीकरण निर्माण झाले आहे. त्यातही शिवसेना एकेकाळचे कट्टर शत्रू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्याने राज्यातील राजकारणात पोकळी निर्माण झाली असून, या संधीचा लाभ घेऊन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून पक्षाची वाढ करण्याचा राज ठाकरे यांचा मानस आहे. मनसेच्या स्थापनेपासूनच्या गेल्या 13 वर्षांचा इतिहास पाहिल्यास काही अपवाद वगळता मनसेने नेहमीच शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेच्या नेमकी विरोधात भूमिका घेतलेली आहे. कट्टर हिंदुत्वाचा हुंकार दिल्यानंतर एकवीसव्या शतकाच्या सुरुवातीला शिवसेनेने आपली मराठी आणि मुंबईतील मराठी माणूस आणि परप्रांतियांबाबतची भूमिका काहीशी मवाळ केली होती. त्याच काळात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उचलला होता. त्यावेळी शिवसेनेचे हिंदुत्व न स्वीकारता त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली होती. मात्र आता शिवसेनेने सेक्युलर घरोबा केल्याने त्यांची हिंदुत्वाची धार काहीशी मवाळ केली आहे. त्यामुळे शिवसेनेचा पाठिराखा असलेला हिंदुत्ववादी मतदार नाराज असल्याची चर्चा आहे. या मतदाराला आपल्याकडे वळवण्याचा राज ठाकरे यांचा इरादा आहे. आता राज ठाकरे यांनी मनसेचा बहुरंगी ध्वज सोडून हिंदुत्वाचा भगवा ध्वज खांद्यावर घेतल्यास शिवसेनेसह अन्य पक्षांमधील नाराज मंडळी मनसेच्या इंजिनाता स्वार होऊ शकतात. मात्र केवळ हिंदुत्ववादी मतांवर मनसेचे नवनिर्माण होईल असे समजणे जरा घाईचेच ठरेल. त्याचे कारण म्हणजे मनसेचे आतापर्यंतचे विस्कळीत राजकारण होय. मराठीचा मुद्दा घेऊन सुरुवातीच्या काळात मनसेने जोरदार आंदोलने केली होती. त्याच्या जोरावर पक्षाला चांगले यशही मिळाले. मराठी भाषिक मतदारही मनसेकडे मोठ्या प्रमाणावर वळला. साधारणत: 2012 पर्यंत मनसेची वाटचाल चढत्या दिशेने होत होती. मात्र नंतरच्या काळात पक्षात एकप्रकारची धोरणात्मक सुस्ती आली. त्यामुळे पक्षाचे इंजिन रुळावरून घसरले. त्यात नरेंद्र मोदींना समर्थन देण्याचा निर्णयही पक्षासाठी फारसा यशदायी ठरला नाही. नंतर नोटाबंदी, जीएसटीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मोदींविरोधात रणशिंग फुंकले. पण तोही प्रयत्न फसला. याच काळात मनसेचे पक्षबांधणीकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सध्या राज्यात मनसेचे अस्तित्व असले तरी राजकीय वजन संपल्यात जमा झाले आहे. आता शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी जवळीक केल्याने हिंदुत्ववादी मतदार बहुसंख्येने मनसेच्या मागे येईल, याची शक्यता सद्यस्थितीत तरी फारच कमी आहे. पण राज ठाकरेंचे आक्रमक व्यक्तिमत्त्व पाहता ते या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर मतदारांना आपल्याकडे खेचू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे मनसेने हिंदुत्वाची कास धरण्याचे संकेत मिळाल्यापासून मनसे आणि भाजपामध्ये युती होण्याची शक्यताही वर्तवली जाऊ लागली आहे. भाजपासोबत गेल्यास मनसेला राजकीय फायदा होईल, असेही गणित मांडले जात आहे. मात्र अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात कडवट टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी एकाएकी असे वळण घेतल्यास ते त्यांच्या पाठीराख्यांना कितपत रुचेल हा मोठा प्रश्नच आहे.
Video:...तर आमच्या स्टाईलने आंदोलन करु; संभाजी ब्रिगेडने दिला मनसेला इशारा
'राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती भाजपावर नाही'
बाळा नांदगावकरांचे 'मनसे' संकेत; भविष्यात कोणत्या राजकीय पक्षासोबत होऊ शकते युती? मात्र सध्यातरी बदललेल्या परिस्थितीत हिंदुत्वाचा मुद्दा उचलून पक्षाचे नवनिर्माण करण्याची संधी राज ठाकरेंना मिळू शकते. पण पक्षाचे नवनिर्माण करत असताना त्यांनी पक्ष संघटनेचेही नवनिर्माण करण्याची गरज आहे. कारण राज ठाकरे यांना आपल्या आक्रमक भाषणामधून कितीही वातावरणनिर्मिती केली तरी शेवटी मतरादांना खेचून आणण्याचे काम पक्षसंघटनेलाच करावे लागते. त्यामुळे पक्षसंघटना कमकुवत राहिली तर पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या अशीच स्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.