मुंबई : मुंबई एन्ट्री पॉर्इंटला होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लेन वाढवण्याचे निर्देश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. तसेच जड वाहनांना एकाच मार्गाने वाहतूक करता यावी यासाठी युद्धपातळीवर काम कसे होईल याकडे लक्ष देण्यात येईल, असे शिंदे म्हणाले. वाहतूक कोंडी वाढल्यास पीक अवरला ‘यलो लाईन’चा नियम लावून लाईनच्या पलिकडे असलेल्या वाहनांना सोडून देण्याचे निर्देश देण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले. काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई एन्ट्री पॉईंट आणि मुंबई- पुणे एक्सप्रेस वे येथील टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना सूट देण्याबाबत सरकार ठाम आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे. हलक्या वाहनांना सूट किंवा टोलमुक्ती या मुळे राज्य सरकारवर येणारा भार व या टोलनाक्यांची डागडुजी, देखभाल दुरुस्ती याचाही आढावा घ्यावा लागणार आहे. या प्रश्नाची व्याप्ती मोठी आहे. जास्त पैसे उकळणा-या कंत्राटदारांवर कारवाई करणार एसटीच्या बसगाड्यांना टोलमध्ये सवलत देण्यात आली आहे. तरीही काही कंत्राटदार जास्तीचा टोल वसुली करत असल्याचा आरोप संजय दत्त यांनी केला. एसटीकडून अनेक ठिकाणी १०७ रुपये जादा वसूल केले जातात. दिवसाला ५५० गाड्या जात असतील तर वर्षाला १८ लाख रुपये जास्तीचे दिले जातात, असेही ते म्हणाले. दरम्यान, अशा पद्धतीने कुठे जादा पैसे उकळले जात असतील अशा कंत्राटदारांवर कारवाई करू, कंत्राटदारांना पाठिशी घालणार नाही, कंत्राटदारांना सरकार बांधिल नाही, असे यावेळी मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. असे प्रकार करणा-या कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली.
मंबई एन्ट्री पॉर्इंटला लेन वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 4:18 AM