उस्मानाबाद - इंदुरीकर महाराजांच्या गर्भलिंग निदानाच्या वक्तव्यावरुन त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. मात्र भाषणातील एखाद्या चुकीच्या वक्तव्यावरुन इंदुरीकर महाराजांना टार्गेट करणं बरोबर नाही असं म्हणत भाजपाने या वादात उडी घेतली आहे.
याबाबत बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, कायदा हा सगळ्यांसाठीसारखा आहे. महाराजांना २ तासांच्या कीर्तनामध्ये एखादा शब्द चुकीचा निघाला असेल तर कोणी त्याची तक्रार करत असेल तर हा विषय गंभीर आहे, त्यांचा उद्देश काय होता हे तपासलं पाहिजे, नोटीस देणं म्हणजे कायदेशीवर कारवाई होईल असं त्यांनी सांगितले.
पण त्याचसोबत इंदुरीकर महाराजांचे प्रबोधन, प्रचारातून चांगला उपदेश देण्याचं काम करतायेत त्याबद्दल सरकारची भूमिका वाईट आहे असं नाही, थोडी चूक काय केली असेल तर कायदेशीर कारवाई होईल पण गुन्हा दाखल करेल असं नाही, जी कारवाई असेल ती करु असं सांगत बच्चू कडू यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे स्पष्ट नाही.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, इंदुरीकर महाराजांची दिवसाला 80 प्रवचनं होतात. ती सगळी जनप्रबोधनाची असतात. प्रवचनातून ते शिक्षकांचं आणि पाण्याचं महत्त्व मांडतात. पण त्यांनी महिलांबद्दल असं म्हणायला नको होतं. एक वाक्यानं सगळं माणसांचं गेलं, असं होत नाही. मीसुद्धा इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला जातो. एकदा पाच मिनिटं बसायच्या उद्देशानं गेलो होतो, मी तासभर थांबलो. इतकं मार्मिकपणे ते समाजातल्या चुकांवर बोट ठेवत आहेत. एका चुकीमुळे त्यांचं सगळं गेलं. एका वाक्यामुळे व्यक्ती खराब होत नाही. इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
तर इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये समाज प्रबोधनाच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडतात. आणि आपल्यामध्ये एखादी चूक असेल ती दुरुस्ती करुन घेणे यात कोणताच कमीपणा नाही. त्यांनी ही चूक दुरुस्त करुन घ्यावी, यापुढे येणाऱ्या काळात एवढा मोठा समुदाय त्यांचे किर्तन ऐकतो, त्यांना विज्ञान नीट समजून सांगाव, स्त्री-पुरुष समतेचं मुल्य समजून सांगावं. त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातून अनेक लोकांना गैरसमजातून बाहेर काढण्याची त्यांना संधी मिळाली आही. ही संधी त्यांनी घ्यावी असं आवाहन हमीद दाभोळकरांनी केलं आहे.