मुंबई : मुंबईचे आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते आहे. रक्त देऊन मुंबई मिळवली आणि रक्तदान करून मुंबई वाचवतो आहोत. होर्डिंग लाऊन मुंबईकर असल्याचे शिवसेनेला सांगावे लागत नाही. हुतात्मा चौकात जाऊन प्रचाराला सुरुवात करणारे भाजपावाले अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेदरम्यान केला.संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारकाला अभिवादन करत भाजपाने मुंबईतील प्रचाराची सुरुवात केली. या वेळी भाजपा उमेदवारांनी पारदर्शक कारभाराची शपथही घेतली. यावर उद्धव ठाकरे यांनी थेट हल्ला चढविला. शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याची शपथ घेतलीच आहे. तशीच अखंड महाराष्ट्राचीही घेतली आहे. पण, जे आज हुतात्मा चौकात गेले ते अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का, असा थेट सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. या वेळी भाजपाच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्यावरही त्यांनी हल्लाबोल केला.तब्बल २५ वर्षे मुंबई महापालिकेत एकत्र नांदलेल्या भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने विशेषत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत भाजपाचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. गिरगाव येथील शनिवारच्या सभेनंतर रविवारी भांडुप येथे झालेल्या सभेत उद्धव यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधत ‘मुंबई आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते’ असल्याचे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘महाराष्ट्राचा एक इंच तुकडादेखील तुटू देणार नाही,’ असा इशारा उद्धव यांनी नाव न घेता भाजपाला दिल्याने आता भाजपा याला काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.भांडुप येथील जाहीर सभेतील विशाल समुदायाला संबोधताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली. उद्धव म्हणाले, मुंबईचे आणि शिवसेनेचे जे नाते आहे ते कुठलाही पक्ष स्थापन करू शकलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे काही जणांना सांगावे लागतं की आम्ही मुंबईकर आहोत, असे म्हणत उद्धव यांनी उपऱ्यांना लक्ष्य केले. मुंबईत पारदर्शक कारभार असून, हे केंद्राला दिसले आहे. परिणामी, मुंबई महापालिकेप्रमाणे राज्य सरकारमध्येही पारदर्शकता हवी आहे. मुंबई आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते असून, महाराष्ट्राचा एक इंच तुकडादेखील तुटू देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवू, तोडू देणार नाही. शपथ घ्यायची आहे तर अखंड महाराष्ट्राची घ्या, असेही उद्धव यांनी या वेळी ठणकावले.‘धनुष्यबाण’ हाच शिवसेनेचा उमेदवार असून, ज्या ज्या वेळी संकटे येतात, त्या त्या वेळी माझे शिवसैनिक धावून जातात, असे म्हणत उद्धव यांनी तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचे काम मी करतो, असे आवाहनही शिवसैनिकांना केले. साडेतीन वर्षांत मनपाने धरण बांधले. त्याच्या परवानगीसाठी १० वर्षे लागली. गेल्या पावसाळ्यात दिल्ली, अहमदाबाद शहरे तुंबली, पण मुंबईत पाणी तुंबले नाही, असे म्हणत उद्धव यांनी कोस्टल रोडसाठी केंद्राकडून मंजुरी कधी येणार, स्वत:च्या बुडाखाली काय दडवून ठेवलं ते दाखवा, असा सवालही उद्धव यांनी या वेळी केला.
अखंड महाराष्ट्राची शपथ घेतील का?
By admin | Published: February 06, 2017 3:12 AM