मनिषा कायंदेंची आमदारकी रद्द होणार?; जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 06:46 PM2023-06-19T18:46:57+5:302023-06-19T18:47:48+5:30
विधान परिषदेत संध्या ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादीचे ९ आमदार आहेत. दोघांचे संख्याबळ सारखे आहे.
मुंबई - ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश घेतला. कायंदे यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंसाठी धक्का मानला जात आहे. कारण मनिषा कायंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाने विधान परिषदेतील ठाकरेंचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे ठाकरेंकडे असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात आले आहे.
मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने त्यांची आमदारकी जाणार का असा प्रश्न आहे. त्यावर जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात की, शिवसेना अधिकृत पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विद्यमान आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी ती अपात्रता मानली जात नाही. कारण मी शिवसेनेतच आहे, शिवसेना सोडलेली नाही असा त्यांचा युक्तिवाद असू शकतो. मात्र हा निर्णय १० व्या परिशिष्ठानुसार विधान परिषदेच्या सभापतींना घ्यायचा आहे. त्यांचा निर्णय अंतिम असतो असं त्यांनी म्हटलं.
तसेच विधान परिषदेत संध्या ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादीचे ९ आमदार आहेत. दोघांचे संख्याबळ सारखे आहे. विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरे गटाला मान्यता मिळाली आहे. पण दुसऱ्या गटाने त्यावर दावा सांगितला तर विधान परिषदेच्या सभापतींना हा गुंता सोडवावा लागू शकतो. कोणाकडे बहुमत आहे हे सभापती ठरवतील असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून मविआत संघर्ष पाहायला मिळू शकतो.
अजित पवारांचे सूचक विधान
मनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आम्ही अजुनही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी विचार केलेला नाही. आम्ही आता या पदासाठी विचार करणार आहे. ज्यांच्या अधिक जागा असतात त्यांना विरोधी पक्षनेते पद असते, असं सूचक विधान अजितदादांनी केलं आहे.