मुंबई - लोकसभा निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा टॅक्टर फॅक्टर मोठ्याप्रमाणात चर्चेत आला होता. आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा शिवस्वराज्य बहुजन पक्ष औरंगाबादमधील ६ जागा लढवणार असल्याचे जाधव यांनी जाहीर केले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे मराठा फॅक्टर पुन्हा जाधवांच्या पाठीशे उभा राहिला तर युतीची अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, स्वता:चा पक्ष स्थापन करत जाधव यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात बंड ठोकले होते. विशेष म्हणजे जाधवांच्या मराठा फॅक्टरमुळे २० वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला होता . तर जिल्ह्यातील मराठा समाज जाधव यांच्या पाठीशी उभा राहिला असल्याचे यावेळी दिसून आले. त्याचप्रमाणे जाधवांचा टॅक्टर फॅक्टरने राज्याचे लक्ष आकर्षित केले असल्याचे पाहायला मिळाले होते.
आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा जाधव यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ६ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा त्यांना मराठा समजाचे पाठींबा मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र लोकसभा सारखेच पुन्हा विधानसभा निवडणुकीत सुद्धा मराठा फॅक्टर चालला तर युतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे.
लोकसभा निवडणुकीत 'गेमचेंजर' ठरलेले जाधव यांना तब्बल २ लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली होती . ग्रामीण भागातील मराठा समाज पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा राहिला असल्याचे पाहायला मिळाला होते. विधानसभेत सुद्धा त्यांना पुन्हा तीच अपेक्षा असली तरीही मात्र लोकसभेत मराठा समाजातील खैरे यांच्या विरोधातील नाराजी उफाळून आली होती. परंतु विधानसभेत स्थानिक उमेदवार कोण आहे, त्यानुसार जातीचे समीकरण स्पष्ट होतात. त्यामुळे जाधवांचा लोकसभेतील फॅक्टर ऐनवेळी कुणाच्या पाठीमागे उभा राहणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.