ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - 'भारतमाता की जय’वरून देशात सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नसतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काश्मीरमधील भाजपा-पीडीपीच्या युतीच्या मुद्यावर भाष्य करत 'सध्या राष्ट्रवादावर चर्चा झडत असताना जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय'? असा सवाल करत उद्धव यांनी बाजपाच्या राष्ट्रप्रेमाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. देशविरोधी मुक्ताफळे उधळणा-या, कश्मीरात हिंदुस्थानविरुद्ध घोषणा देणार्यांना सहानुभूती दाखवणा-या मेहबूबा मुफ्ती यांची आता संसदेवर हल्ला करणार्या अफझल गुरूच्या बाबतीत काय भूमिका आहे? असा थेट सवालही त्यांनी अग्रलेखातून विचारला आहे.
भाजपने मेहबुबा यांच्याबरोबर नवा डाव मांडला, पण लाखो कश्मिरी पंडितांच्या जीवनाचा डाव अतिरेक्यांनी उधळून लावला आहे. आता काश्मीरात पीडीपी-भाजप सरकारचा नवा पाळणा एकदाचा हलला आहे असून निदान आता तरी कश्मीर खोर्यात शांतता नांदो व देशावरचे ओझे कमी होवो! अशी अपेक्षा उद्धव यांनी अग्रलेखात व्यक्त केली आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
- तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जम्मू-कश्मीर राज्यात सरकारचा पाळणा पुन्हा एकदा हलला आहे. मेहबुबा मुफ्ती जम्मू-कश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील व भाजपचे वर्हाडी या सोहळ्यात त्यांच्यावर अक्षता, फुलांचा वर्षाव करतील. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृत्यूनंतर जम्मू-कश्मीरात अधांतरी राजकीय परिस्थिती निर्माण झाली. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा यांनी भाजपशी नव्याने घरोबा करण्यास नकार दिला व पुढचे तीन महिने कश्मीर खोर्यात भाजपला कान धरून उठाबशा काढायलाच काय ते बाकी ठेवले. अत्यंत महत्त्वाचे असे की, मेहबुबा मुफ्ती यांच्याशी भारतीय जनता पक्षाचे कधीच पटले नाही. मेहबुबाबाईंची देशविरोधी मुफ्ताफळे, त्यांचे फुटीरतावाद्यांशी असलेले संबंध हा नेहमीच वादाचा विषय राहिला. कश्मीरात हिंदुस्थानविरुद्ध घोषणा देणार्यांना या बाईसाहेबांची सहानुभूती राहिली व हे सर्व उघड उघड होत राहिले. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती भाजपच्या पाठिंब्याने कश्मीरच्या मुख्यमंत्री होत आहेत याचे कौतुक भाजपला असले तरी देशाला मात्र चिंता आणि चिंताच वाटत आहे.
- मेहबुबा मुफ्ती या कश्मीरच्या मुख्यमंत्री होणार हे नक्की होताच काही प्रश्नांना तोंड फुटले आहे. सध्या देशात राष्ट्रवादावर चर्चा झडत आहेत. त्यामुळे मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय? असा प्रश्न विचारला गेला आहे. हा प्रश्न आमच्या मनात असला तरी दिल्लीतील ‘आप’चे नेते व ओमर अब्दुल्लासारख्या मंडळींनी हा प्रश्न विचारून भाजपला अस्वस्थ केले आहे. हैदराबादचा ओवेसी निर्ढावलेपणाने सांगतोय की, ‘भारतमाता की जय म्हणणार नाही.’ तेव्हा ‘भारतमाता की जय’ म्हणणे ही देशभक्ती व राष्ट्रवाद असल्याची भूमिका भाजप नेत्यांनी मांडली, पण हिंदुस्थानातील एक राज्य असलेल्या ‘जम्मू-कश्मीर’च्या मुख्यमंत्री ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय? हा प्रश्न आहेच. संसदेवर हल्ला करणार्या अफझल गुरूच्या बाबतीत मेहबुबाबाईंची आता काय भूमिका आहे? कारण अफझल गुरूस अतिरेकी, दहशतवादी मानण्यास मेहबुबा व त्यांचा पीडीपी पक्ष तयार नाही. अफझल गुरूचे मृत शरीर तिहारातून उकरून कश्मीरात आणावे व एखाद्या वीर योद्ध्यासारखे त्याचे दफन करावे असे मेहबुबा मुफ्ती यांच्या आजही मनात आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच हा भयंकर विचार झटकून टाकून त्या
नव्या राष्ट्रवादी विचारांची कास धरतील काय?
- कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. कश्मीरचा एक तुकडा पाकड्यांनी गिळला आहे व ही सल हिंदुस्थानला छळते आहे. पाकिस्तानने कश्मीर रक्तबंबाळ केला आहे व कश्मीरच्या निमित्ताने संपूर्ण हिंदुस्थानवरच घाव घातले जात आहेत. कश्मीरची फार मोठी किंमत आपण चुकवीत आहोत. कश्मीरात शांतता नांदावी व कश्मीरातील निर्वासित कश्मिरी पंडितांनी पुन्हा स्वगृही परतावे असे आम्हाला वाटते. भाजपने मेहबुबा यांच्याबरोबर नवा डाव मांडला, पण लाखो कश्मिरी पंडितांच्या जीवनाचा डाव अतिरेक्यांनी उधळून लावला आहे. हा डाव नव्या राज्यव्यवस्थेने पुन्हा बसवायला हवा. ‘भारतमाता की जय’ म्हणणार्या कश्मिरी पंडितांनी बलिदान दिले. त्यांनी सांडलेल्या रक्ताच्या सड्यावर नवे राजशकट उभे राहत आहे म्हणून नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधीआधी ‘भारतमाता की जय’ म्हणावे अशी अपेक्षा देशाने ठेवलीच तर वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. कश्मीरात पीडीपी-भाजप सरकारचा नवा पाळणा एकदाचा हलला आहे. निदान आता तरी कश्मीर खोर्यात शांतता नांदो व देशावरचे ओझे कमी होवो!