मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक राहिले असल्याने सर्वच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. तर विद्यमान आमदार पुन्हा आपल्यालाच संधी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा हे सलग दोन वेळापासून मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मिळाले मताधिक्य पाहता पावरा यांच्यासमोर विजयाची हॅट्रिक करणे मोठे आव्हान ठरणार आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिरपूर मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमरीश पटेल यांचे वर्चस्व आहे. पटेल हे १९९० पासून २००४ पर्यंत सलग चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र २००९ ला हा मतदारसंघ राखीव झाल्याने काँग्रेसकडून काशीराम पावरा यांना उमेदवारी देण्यात आली होती. आमदार पावरा यांनी विजयाची मालिका कायम ठेवत सलग दोन वेळा या मतदारसंघाच नेतृत्व केलं. मात्र शिरपूरात भाजपची वाढती ताकद लक्षात घेत, यावेळी त्यांच्यासाठी तिसऱ्यांदा विजय मिळवणे आव्हान ठरणार आहे.
१९९० पासून सलग काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या शिरपूरात, नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने मताधिक्य मिळवले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार हीना गावित यांना शिरपूर विधानसभा मतदारसंघातून १ लाख १७ हजार ३८८ तर काँग्रेसचे उमेदवार के.सी.पाडवी यांना ७६ हजार ६८२ मते मिळाली होती. भाजपला शिरपूरात ४० हजार ७०६ मताधिक्य मिळाले असल्याने परिवर्तन होणार असा विश्वास भाजपला आहे.
मतदारसंघातील अवैध धंधे असो किंवा आदिवासी समजाचे प्रश्न असो, यासाठी आमदार पावरा यांनी काढलेले मोर्चे त्यांच्या जमेच्या बाजू म्हणता येईल. मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपची वाढती ताकद पाहता यावेळी शिरपूरात विधानसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार हे मात्र नक्की.