ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 10 - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यासंबंधी अद्याप अंतिम वेळापत्रक आले नसून, मोदी संघ मुख्यालय किंवा संघ स्मृतिमंदिराला भेट देणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे. संघाचे मोठे पदाधिकारी यादिवशी नागपुरात नसले तरी मोदींनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला भेट द्यावी, अशी संघ स्वयंसेवकांची भावना आहे. नागपूर नरेंद्र मोदींसाठी नवे शहर नाही. प्रचारक होण्यापूर्वी व त्यानंतरदेखील अनेकदा ते रेशीमबागेत वास्तव्याला राहिले आहेत. लोकसभा निवडणुकांअगोदर निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर लागलीच मोदी यांनी १६ जुलै २०१३ रोजी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर देशात सत्ताबदल झाला व पंतप्रधानपदाची सूत्रे मोदींकडे आली. त्यानंतर नरेंद्र मोदी हे दोनवेळा नागपूरला येऊन गेले. २१ आॅगस्ट २०१४ रोजी मेट्रो रेल्वेचा भूमिपूजन समारंभ तर ७ आॅक्टोबर २०१४ रोजी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेसाठी ते आले होते. मात्र दोन्ही वेळेला मोदी यांनी संघ स्मृतिमंदिर किंवा संघ मुख्यालयात जाणे टाळले होते.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधून पंतप्रधान दीक्षाभूमीवर जाणार आहेत. येथे भेट देणारे ते तिसरे पंतप्रधान ठरतील. याच दिवशी मोदींनी संघस्थानालादेखील भेट द्यावी, अशी संघ स्वयंसेवकांची अपेक्षा आहे. संघाची परंपरा लक्षात घेतली तर मोदींना आमंत्रण देण्यात येणार नाही. मात्र जर मोदींनी येण्याची इच्छा दर्शविली तर संघाकडून त्यांचे यथोचित स्वागत करण्यात येईल. मात्र अद्याप मोदींचा अंतिम कार्यक्रम पंतप्रधान कार्यालयातून जारी झालेला नाही. त्यामुळे मोदींच्या संघस्थानावरील भेटीबाबत संभ्रम कायम आहे. अटलबिहारी वाजपेयींनी दिली होती भेटपंतप्रधानपदी असताना संघ मुख्यालयात येणारे अटलबिहारी वाजपेयी हे एकमेव पंतप्रधान आहेत. २६ आॅगस्ट २००० रोजी वाजपेयी ज्येष्ठ संघ प्रचारक नारायणराव तार्ते यांची भेट घेण्यासाठी रेशीमबागेत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी हेदेखील होते. तत्कालीन सरसंघचालक के.एस.सुदर्शन यांच्यासोबत वाजपेयी यांची भेट झाली नव्हती, हे विशेष. जर मोदी यांनी १४ एप्रिल रोजी संघस्थानाला भेट दिली तर ते असे करणारे देशाचे दुसरे पंतप्रधान ठरतील. सरसंघचालकांच्या दौ-यात बदल?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १४ एप्रिल रोजी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी नागपुरात नाहीत. मात्र प्रवासादरम्यान एका दिवसासाठी डॉ. भागवत १४ एप्रिल रोजी नागपुरात येण्याची शक्यता आहे. याबाबत संघ पदाधिकाऱ्यांनी मौन साधले आहे. संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अतुल पिंगळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पंतप्रधान मोदी संघस्थानाला भेट देणार की नाही?
By admin | Published: April 10, 2017 9:15 PM