लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार का? नाना पटोले म्हणाले, "बहिणीला पायावर उभं करण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:45 PM2024-10-30T17:45:14+5:302024-10-30T17:45:24+5:30

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महागाई खूप वाढल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Will Mukhyamantri Ladki Bahin Yojan continue Nana Patole replay | लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार का? नाना पटोले म्हणाले, "बहिणीला पायावर उभं करण्यासाठी..."

लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार का? नाना पटोले म्हणाले, "बहिणीला पायावर उभं करण्यासाठी..."

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. महाविकास आघाडीचे नेते सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र आता महाविकास आघाडीचा भाग असलेल्या नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. मात्र निवडणुकीसाठी ही योजना आणली गेली असून निकालानंतर ती योजना बंद केली जाणार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. पण आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

"महायुती सरकारचे प्रत्येक योजनेमध्ये पैसे खाण्याचे काम  आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणांचे दुरुस्ती करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार होता. सरकारकडे गेल्यावर सरकारने यामध्ये आमचा काय हिस्सा असं विचारलं. ते म्हणाले तुम्हाला २०० कोटी मिळतील ३०० कोटी कामांवर खर्च करावे लागतील. सरकारने ५०० जागी हजार कोटी वाढवण्यात सांगितले. महाराष्ट्र असा लुटला गेला. माहितीचे सरकार भ्रष्टाचारामध्ये अहवाल येणार आहे. एखाद्या छोट्याशा प्रकल्पामध्ये हजार कोटी खाण्याची नियत महायुती सरकारची असेल तर सरकारची तिजोरी रिकामी होणारच," असं नाना पटोले म्हणाले.

"लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महागाई खूप वाढली. खायचा तेलाच्या किमती ६० ते ७० रुपयांनी वाढल्या. म्हणून मी त्यांना बेईमान भाऊ म्हणत आहे. काँग्रेसने बहिणींना नेहमी सन्मान देण्याचे काम केलं आहे," असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.

"आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहे. आम्ही महिलांना दीड हजार पेक्षा जास्त पैसे देऊ. हजार दीड हजार रुपयांनी काही संसार चालत नाही. मला महाराष्ट्रात रिसोर्सेस उभे करायचे आहेत. त्यातून बहिणीच्या हाताला आम्ही काम देऊ. गृह उद्योग निर्माण करून देऊ. माझी बहीण स्वतःच्या पायावर उभी राहू शकली पाहिजे. तिला गावामध्ये रोजगार निर्माण करून देण्याचा आमचा प्लॅन आहे. बहिणीला स्वतःच्या पायावर उभं करण्याचे स्वप्न आहे म्हणूनच आम्ही या योजनेचे नाव महालक्ष्मी ठेवतो आहोत," असंही नाना पटोले म्हणाले. 
 

Web Title: Will Mukhyamantri Ladki Bahin Yojan continue Nana Patole replay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.