ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - मुंबईतील ब्रिटीशकालीन वास्तू, मंदिर, समुद्रकिनारे ही जशी मुंबईची ओळख आहे तसेच बेस्ट उपक्रमाची बससेवाही या शहराची एक ओळख आहे. परराज्यातून येणा-या पर्यटकांना, लहान मुलांना मुंबईतील लाल रंगाच्या बससेवेचे प्रचंड आकर्षण असते. लवकरच मुंबई शहराची ओळख असलेल्या या बेस्ट बसेसचा रंग बदलण्याचा प्रस्ताव आहे.
बेस्टच्या सर्व बसेसना सफेद आणि पिवळा रंग देण्याचा प्रशासनाचा विचार आहे पण हा बदल करण्याआधी लोकांचे मत विचारात घेण्यात येईल. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रायोगित तत्वावर सफेद आणि पिवळा रंगाच्या दोन बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसतील.
रंगबदल हा बेस्टच्या परिवहन व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याच्या योजनेचा भाग आहे. लवकरच बस स्टॉपवर आणि बसमध्ये वाय-फाय सुविधा, किती मिनिटात बस येणार त्याची माहिती एकूणच प्रवासात प्रवाशांना मोबाईलवर मनोरंजनाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची बेस्टची योजना आहे.
मागच्या काहीवर्षांपासून बेस्ट प्रवाशांची संख्या सातत्याने घटत आहे. ही संख्या वाढवण्यासाठी बेस्टने ही योजना आखली आहे. बेस्ट समितीमधील अनेक सदस्यांनी रंग बदलण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. सफेद रंगाच्या देखभालीचा खर्च परवडणार नाही त्यामुळे समिती सदस्यांनी विरोध केला आहे.
बेस्टबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ?
मुंबईच्या सार्वजानिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय लोकलपाठोपाठ बेस्ट बसचा प्रवासासाठी सर्वाधिक उपयोग केला जातो. दररोज 28 लाख लोक बसने प्रवास करतात. उपनगरीय लोकलने प्रवास करणा-यांची संख्या 75 लाख आहे. मागच्या काहीवर्षात अरुंद रस्ते, ट्रॅफीक यामुळे बसने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या कमी झाली असून, दुचाकींची संख्या वाढली आहे.
बसचा रंग लाल का असतो?
१९०७ सालापूर्वी बसेसा या त्यांच्या जाणा-येण्याच्या मार्गानुसार वेगवेगळ्या रंगात रंगवलेल्या असत. मात्र विविध बस कंपन्यांमधील स्पर्धेमुळे लंडन जनरल ओम्नीबस कंपनीने (LGOC) सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी त्यांची बस लाल रंगाने रंगवली. मेट्रोपोलिटन पोलिसांच्या प्रोत्साहनानंतर त्यांनी वेगवेगळ्या मार्गांसाठी बसवर नंबरही लावले.
केव्हा धावली पहिली बस?
४ जुलै १८२९ साली जॉर्ज शिलीबीअर याने लंडन शहरातील पहिली ओम्नी बससेवा सुरू केली. पॅडिंग्टन ते न्यू रोड ते बँक असा त्या बसचा मार्ग होता. पॅरिसमध्ये असताना तेथील सेवा पाहून त्याला ही कल्पना सुचली. या ओम्नीबसमध्ये २२ प्रवासी बसू शकत होते आणि तीन घोडे ती बस ओढत.