मुंबई - सगेसोयरे करण्यापेक्षा यापुढे आईचीच जात लावली जाईल अशी पुरोगामी घोषणा करा. मग ती मागासवर्गीय असेल तर तिच्या मुलांना आरक्षणाच्या सवलती मिळतील. त्यामुळे आग लावण्याचे काम बंद करा. हिंदू मुस्लीम याप्रमाणे ओबीसी मराठा बाजूला करण्याचं काम सत्ताधारी करतायेत. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सगेसोयरे हा धोकादायक शब्द सरकारने घातला आहे. याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे नाहीतर आमच्याही सगेसोयऱ्यांना वंजाऱ्यांचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा अशी मागणीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केली.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आता सरकारने जी अधिसूचना काढलीय त्यात सगेसोयरे यांनाही प्रमाणपत्रे द्या असं म्हटलं आहे. माझी बायको ब्राह्मण आहे. मग तिच्या बहिणीला तुम्ही वंजारी म्हणून प्रमाणपत्र देणार का? ते सगेसोयरे झाले ना...तिच्या बहिणीच्या मुलांना प्रमाणपत्र देणार का, सगेसोयरे आहेत. रक्ताचे नाते आहे. मग यापुढे कायदा करा. आंतरजातीय विवाहात जर एखाद्या मागासवर्गीय मुलीने सवर्ण मुलासोबत लग्न केले तर त्या मुलीची जात मुलांना लागली पाहिजे. तुम्ही पुरुषसत्ताक पद्धत का राबवता, महिला महत्त्वाची नाही का? त्यामुळे आमची मागणी आहे जर एखाद्या मागासवर्गीय मुलीने सवर्णाशी लग्न केले तर तिची जात तिच्या मुलांना लागली पाहिजे. कारण तिच्याच गर्भातून मुलांचा जन्म होतो असं त्यांनी सांगितले.
तसेच आज पक्षाच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शरद पवारांचे ओबीसी समाजावर जे योगदान आहे ते कुणीही विसरू शकत नाही. मंडल आयोज जेव्हा आला तेव्हा त्याची अंमलबजावणी देशात पहिल्यांदा शरद पवारांनी केली. आज महाराष्ट्रात अनेक उच्च पदावर बसलेले अधिकारी ही मेहरबानी शरद पवारांची आहे. राजकीय व्यवस्थेत कुठेही नसलेला वंजारी, माळी, धनगर यांना आरक्षण देऊन राजकीय व्यवस्थेत आणण्याचे काम, प्रस्थापित जातीच्या विरोधात जाऊन शरद पवारांनी केले. त्यामुळे शरद पवारांचे ओबीसीच्या भल्यासाठी जितकं योगदान आहे तितकं कुणाचे नाही असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भुजबळांसोबत आमचे वैचारिक मतभेद असतील. परंतु ते ज्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांच्या सत्तेतील एका पक्षातील आमदाराने जी भाषा वापरली ती योग्य नाही. भुजबळ मंत्रिमंडळात ओबीसींची बाजू मांडण्यात कमी पडतायेत हे दिसतंय. त्यामुळे छगन भुजबळांनी निर्णय घ्यावा आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमचे मत स्पष्ट आहे. मराठ्यांना आरक्षण द्यावे, पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. आपण सर्व बहुजन आहोत. बहुजनांमध्ये भांडणे लावण्याची काहींची इच्छा आहे. कारण बहुजन एक झाले तर सत्ता दुसरीकडे जाऊ शकत नाही हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे बहुजनांना एकाबाजूला काढा आणि मराठ्यांना एकाबाजूला काढा. दोघांनाही झुंजवत ठेवा असा आरोप आव्हाडांनी सरकारवर केला.
भुजबळांना एकटे का पाडले?
मंत्रिमंडळाच्या बाहेर येऊन भुजबळ जी भूमिका मांडतायेत ते त्यांनी मंत्रिमंडळात मांडावी. आपण संयुक्तरित्या मंत्रिमंडळात होतो तेव्हा ओबीसींच्या फाईली कोण दाबून ठेवायचे. सर्वात जास्त विरोध कोणाचा असायचा. के.सी पाडवींना कुणी छळले हे विचारा. आदिवासींबाबतीत कसे अन्याय करायचे हे विचारा. ओबीसींनी एकत्रच राहावे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे परंतु ओबीसींचे कमी करून मिळू नये. जिथे अन्याय तिथे अन्याय, मतभेद झाले ही वेगळी गोष्ट. पण राजकारणात अशी भाषा वापरणे ही पद्धत नाही. का त्यांच्या पक्षाने निषेध केला नाही. भुजबळांना एकटे का पाडले. ते कुठल्या जातीचेपातीचे सोडून द्या. पण मंत्रिमंडळात तुमच्यासोबत आहेत. त्यांच्याबद्दल अशी भूमिका, शरद पवार पुरोगामी, बाकी कुणी नव्हते असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.