लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात शुक्रवारी जबाब नोंदविला. सेटिंग करून संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत टाकले आणि त्यांना खासदार बनविण्यामागे आपला हात आहे, असे वादग्रस्त विधान नारायण राणे यांनी एका कार्यक्रमात केले होते. याच वक्तव्यावरून राऊत यांनी नारायण राणे यांच्याविरोधात या आधी मुलुंड न्यायालयात तक्रार केली होती.
१५ जानेवारी २०२३ रोजी भांडुप येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात काही वक्तव्ये केली. राणे यांनी म्हटले की, राऊत आपल्यामुळेच खासदार आहेत. त्यांचे नाव मतदार यादीत नव्हते. मी सेटिंग केल्याने त्यांचे नाव मतदार यादीत आले. ते निवडणुकीला उभे राहिले तेव्हा मी पैसे खर्च केले.
या वक्तव्यावर संजय राऊत यांनी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी तक्रार केली आहे. या तक्रारीसंबंधी राऊत यांनी राणे यांच्याविरोधात शुक्रवारी मुलुंड न्यायालयात जबाब नोंदविला.