नागपूर - नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं गेले असं सांगण्यात आले. मी सामान्य कार्यकर्ता, माझ्या मतदारसंघातील लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलू असं सांगत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. त्यात आज छगन भुजबळ अधिवेशनासाठी नागपूरात आले तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नाराजी बोलून दाखवली.
छगन भुजबळ म्हणाले की, मी सामान्य कार्यकर्ता मला डावललं काय, फेकलं काय फरक काय पडतोय. मंत्रिपद कितीवेळा आले आणि गेले. छगन भुजबळ संपला नाही ना..ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं. अजित पवारांशी बोलण्याची गरज वाटली नाही. माझ्या मतदारसंघातील लोक आणि समता परिषदेचे कार्यकर्ते त्यांच्याशी मी बोलणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याचं बक्षीस मिळालं अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
त्याशिवाय ओबीसीची लढाई जी लढली त्यामुळे ओबीसी एकत्र झाले आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. ओबीसींचा पाठिंबा आणि लाडकी बहीण योजनेचा विजयात वाटा आहे. मला मंत्रिपद का घेतले नाही हे माहिती नाही. ज्यांनी घेतले नाही त्यांना प्रश्न विचारा. नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय असं सांगितले असंही छगन भुजबळ बोलले.
दरम्यान, ओबीसीच्या प्रश्नांना घेऊन लढणारा नेता या सरकारमध्ये असेल पण दुर्दैवाने या मंत्रिमंडळात भुजबळ नाहीत हे मंत्रिमंडळाचे दुर्देव आहे की ओबीसींचे दुर्दैव आहे असं सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळांना मंत्रिमंडळात न घेतल्याने भाजपावर टीका केली आहे.
ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळात डावललं, कार्यकर्ते नाराज
मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष सुरू असताना मराठा समाजाच्या आरक्षणला कुठेही छगन भुजबळ यानी विरोध केला नव्हता तरी जाणून बुजून मनोज जरागेच्या माध्यमातून भुजबळांना टार्गेट केले जात होते . अशा कठीण परिस्थितीत राज्यातील वातावरण महायुतीच्या विरोधात खोटा प्रचार प्रसार करुन केले जात होता. तेव्हा छगन भुजबळांमुळे ओबीसी समाज संपूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या बाजूने उभा राहिला तसेच महायुतीच्या सरकारची भूमिका कशी ओबीसीच्या बाजूने आहे हे ठामपणे पटवून देण्यासाठी ज्या दोन नेत्यांनी संघर्ष केला. यामध्ये सिंहांचा वाटा जर कोणाचा असेल तो छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांचा होता. छगन भुजबळ आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे धनगर-ओबीसी समाजात निश्चित खंत व्यक्त केली जात आहे. ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबन मदने यांनी सांगितले.