राष्ट्रवादी अहमदनगरमधील चूक इंदापूरमध्ये सुधारणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 05:31 PM2019-08-21T17:31:57+5:302019-08-21T17:32:25+5:30
विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे निश्चित मानले जाते. ही जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही आहे. तर हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून लढण्यासाठी तयारीला लागले आहे. परंतु, राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला देण्यास नकार दिल्यास हर्षवर्धन पाटील पक्षांतर करण्याची शक्यता आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात असलेला कम्युनिकेश गॅप निकालानंतर स्पष्ट झाला. अनेक ठिकाणी काँग्रेसला मित्रपक्षाची म्हणावी तशी साथ मिळाली नाही, अशा तक्रारीरी झाल्या. तर जागा वाटपात देखील उभय पक्षांनी योग्य ती भूमिका घेतली नाही. त्यामुळे राज्यात दोन्ही पक्षांचं मोठं नुकसान झालं. अहमदनगरच्या जागेबाबतची राष्ट्रवादीने केलेली चूक दोन्ही पक्षांना भोगावी लागली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे. आता तरी राष्ट्रवादी या जागेचा प्रश्न सामोपचाराने सोडून पक्षांच नुकसान टाळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभेला अहमदनगरची जागा काँग्रेसला द्यावी, अशी मागणी तत्कालीन विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. मात्र राष्ट्रवादीने नगरची जागा काँग्रेसला सोडली नाही. यामुळे राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेसचेही मोठे नुकसान झाले. शिवाय जागाही भाजपने जिंकली. राष्ट्रवादीच्या हटखोर भूमिकेमुळे काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुलासह भाजपमध्ये दाखल झाले. तर नगरमध्ये राष्ट्रवादीकडे नेतेच उरले नाहीत. लोकसभेला सामोपचाराने घेतले असते तर, कदाचित चित्र काहीसं वेगळ राहिलं असतं, असंही अनेकांना वाटतं.
अहमदनगरची जागा सोडली नसल्याने सर्वाधिक नुकसान राष्ट्रवादीचं झालं. पक्षाकडे नगरमध्ये प्रभावी नेताच उरला नाही. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनीही मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामागे विखे पाटलांचा मोठा हात होता. तर ज्यांना लोकसभेला उमेदवारी दिली ते संग्राम जगतापही शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे काँग्रेसने नगरच्या जागेमुळे पक्षातील दिग्गज नेते विखे पाटील यांना गमावले. आता विखे पाटील आपली संपूर्ण ताकद पणाला लावून काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान इंदापूरच्या जागेवरूनही असाच काहीसा पेच निर्माण झाला आहे. २०१४ मध्ये इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे विजयी झाले होते. आता विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे निश्चित मानले जाते. ही जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादी या जागेसाठी आग्रही आहे. तर हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून लढण्यासाठी तयारीला लागले आहे. परंतु, राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला देण्यास नकार दिल्यास हर्षवर्धन पाटील पक्षांतर करण्याची शक्यता आहे. किंबहुना ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. एकूणच इंदापूरच्या जागेवरून उभय पक्षांमध्ये वाद होण्याची शक्यता असली तरी राष्ट्रवादीला योग्य भूमिका घेऊन नगरची पुनरावृत्ती टाळण्याची संधी आहे.