मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक यांनी तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. अशातच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांची कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा' बंगल्यावर जाऊन भेट घेतली.
कुडाळची जागा शिवसेनेकडे असल्याने नारायण राणे आणि एकनाथ शिंदेच्या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. कुडाळ मतदारसंघात महायुतीत उमेदवाराची आदला-बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मतदारसंघावर निलेश राणे यांच्यासाठी भाजपचा दावा आहे. मात्र जागावाटपात कुडाळ मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे निलेश राणे शिवसेनेत येणार की कुडाळ जागेची अदलाबदल होऊन भाजपला दिली जाणार, याविषयी तर्कवितर्क सुरू आहे. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी मोठा खुलासा केला आहे.
नारायण राणे हे विद्यमान खासदार आहेत. ते कोकणातल्या विकासकामांसाठी चर्चा करण्यासाठी गेले असावेत. कुडाळ-मालवण विधानसभेवर आमचा (शिवसेना शिंदे गट) दावा होता. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना अधिकार आहेत. निलेश राणे चांगले कार्यकर्ते आहे. विधानसभेला ते उभे राहणार आहेत, एवढचं मला माहीत आहे. पण निलेश राणे यांना उमेदवारी दिली तर आमची कोकणातील शिवसेनेची ताकद पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असेल. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हांला मान्य असेल, असे उदय सामंत म्हणाले.
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी नारायण राणे यांच्यासाठी काम केले नाही, असा आरोप निलेश राणे यांनी केला होता. त्यामुळे सामंत-राणे यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला. काम करूनही माझ्यावर आरोप होत असल्याचे सांगत सामंत यांनी नाराजी दर्शवली. याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, मी महायुती मानणारा कार्यकर्ता आहे. आमच्यासाठी सगळ्याच जागा महत्त्वाच्या आहेत. शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली उमेदवारांबद्दल जो निर्णय होईल, तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. त्यामुळे मानापमान बाजूला सारून निलेश राणे यांच्याकरिता काम करू, असे उदय सामंत म्हणाले.