मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे हे उद्या, 2 ऑक्टोबरला भाजपा प्रवेश करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले होते. नितेश राणे यांचा कणकवली-देवगड मतदारसंघ भाजपाकडे असल्याने नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी कालच नितेश राणे यांच्यावर सापत्नपणाची वागणूक दिल्याचा आरोप करत स्वाभिमान संघटनेचा राजीनामा दिला होता. नितेश राणे यांनी त्यांना नजीकच्या काळात विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्याचा संशयही नारायण राणे यांनी घेतल्याने नाराज असल्याचे सावंत यांनी सांगितले.
नारायण राणे यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यास देवगडची जागा नितेश राणे यांना सुटणार आहे. सध्या भाजपाकडे माजी आमदार प्रमोद जठार या जागेचे दावेदार होते. मात्र, जठार या जागेसाठी इच्छुक नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जठार यांना नुकतेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बोलवून घेतले होते. 2014 च्या निवडणुकीत जठार यांचा नितेश राणे यांनी पराभव केला होता.
कोकणात भाजपाच्या वाट्याला एकच जागाकोकण पट्ट्यात भाजपाच्या वाट्याला एकच जागा आली असून तो परंपरागत मतदारसंघ आहे. यापूर्वी गोगटे कुटुंबाकडे आमदारकी राहिली होती. 2009 मध्ये गोगटे यांनी माघार घेतल्याने प्रमोद जठार यांना तिकिट दिले होते. तेव्हा जठार यांनी निसटता विजय मिळविला होता.
सतीश सावंतांचे आव्हान?कणकवली मतदारसंघात नाराज सतीश सावंत हे नितेश राणेंना आव्हान देण्याची शक्यता आहे. राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या संपर्कात असून तिकिटासाठी प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले. सतीश सावंत यांनीही पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे.
वैभव नाईक यांना उमेदवारीगेल्या विधानसभा निवडणुकीत मालवण-कुडाळ मतदारसंघातून नारायण राणे यांचा पराभव करणारे शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून सतीश सावंत यांना उतरविण्याचा नितेश राणे यांचा प्रयत्न होता. मात्र, सावंत यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा नारायण राणे उभे राहतात की स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत अपक्ष म्हणून उभे राहतात यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल.