ठाणे : पेरीयार रामास्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक दहशतवादी म्हणणाऱ्या रामदेवबाबांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.देशात ज्या काळामध्ये चातुर्वर्ण्य मनुवाद्यांची वर्णव्यवस्था समाजाला पोखरत होती, त्या काळात या दोन महानायकांनी त्यांच्याविरूद्ध लढा दिला. रामदेवबाबांना बाबा कोण म्हणतं, हे मला माहीत नाही. त्यांनी माफी मागावी, असे आव्हाड म्हणाले.रामदेवबाबांचा एकेरी उल्लेख करताना आव्हाड म्हणाले, ते कोणत्या विचारांनी घडले आहेत, त्याविषयी मला देणेघेणे नाही. पण, या देशातील स्त्रिया, या देशातील तत्कालीन मनुवाद्यांनी ठरवलेला क्षुद्र वर्ग, ओबीसी, एसी, एसटी, व्हीजेएनटी, येथील कामगार, येथील आर्थिक धोरणे ही डॉ. आंबेडकर यांच्यामुळे अधोरेखित झाली. ते एका जातीचे नव्हेतर, संपूर्ण भारतीय समाजाचे होते. जे संविधान तुम्हाला आणि आम्हाला सुरक्षित ठेवते, ते बाबासाहेबांनीच दिले आहे. पेरीयार रामास्वामी यांनी जाती निर्मूलनाचे काम केले. त्यामुळेच रामदेवबाबांनी शहाणपणा दाखवून माफी मागितलेली बरी; अन्यथा त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असे आव्हाड यांनी पत्रकात म्हटले आहे.
रामदेवबाबांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 2:52 AM