ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 15 - महापालिकेच्या निकालानंतरही भाजप-सेना एकत्र येण्याची शक्यता नाही. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर तलवारी बाहेर निघाल्या आहेत. त्या आता म्यान होण्याची शक्यता नाही, असे सांगत आम्ही केवळ सत्तेसाठी एकत्र येणार नाही असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले. लक्ष्मीनगर चौकात बुधवारी राऊत यांनी शिवसेनेच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबई नेहमीच शिवसेना जिंकत आली आहे. या वेळीही जिंकेल. मोदींची भावनेची लाट आली आणि निघून गेली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी युती तोडण्याची घोषणा केली. तेव्हापासूनच सरकारचा नोटीस पिरेड सुरू झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघाचे ज्येष्ठ नेते मा.गो. वैद्य यांनी आपले मार्गदर्शन ज्यांना गरज आहे त्यांनाच द्यावे. भाजपमध्ये पोलीस भरती सारखी गुंड भरती सुरू आहे. वैद्य यांनी आधी त्यांना मार्गदर्शन करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. उत्तर प्रदेशात शिवसेनेचे पाच ते दहा आमदार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला. नागपूरचे काय शिकागो झाले का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी नागपूरकड लक्ष द्यावे, नंतर मुंबईकडे पहावे. मुंबईची तुलना पाटण्याशी करण्यापेक्षा गुन्हेगारीत नागपूर बिहारपेक्षाही पुढे गेले आहे, अशी टीका करीत मग नागपूरचे काय शिकागो झाले का, असा खोचक सवालही त्यांनी केला. विदर्भात मिशन ५० विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर लढताना शिवसेना विदर्भात ह्यमिशन ५०ह्ण हाती घेऊन काम करेल. ५० जागांवर लक्ष केंद्रीत करून कान केले जाईल. युतीमुळे आमचे विदर्भात नुकसान झाले. नाहीतर आणखी शिवसेना वाढली असती, असा आरोपही त्यांनी केला.
सत्तेसाठी एकत्र येणार नाही - संजय राऊत
By admin | Published: February 15, 2017 7:59 PM