मुंबई - महाराष्ट्रात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. यात अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेंची शिवसेना आणि भाजपा एकत्रित मैदानात उतरले आहेत. शिवसेना आणि भाजपाकडून प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा जोराने चालवला जातो तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची विचारधारा पुरोगामी आहे. आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.
आगामी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून आम्ही ६० पेक्षा जास्त जागा लढवणार आहोत. जेव्हा आम्ही महायुतीची चर्चा सुरू केली होती तेव्हाच स्पष्टपणे आमची विचारधारा धर्मनिरपेक्ष आहे आणि त्यावर आम्ही तडजोड करणार नाही असं सांगितले होते. आज आम्हाला प्रश्न विचारले जातात परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी अडीच वर्ष कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेनेसोबत सरकारमध्ये होती, मीदेखील त्याचा भाग होतो. मग तेव्हा हे प्रश्न विचारले नाहीत. त्यावेळी धर्मनिरपेक्ष विचारधारा आणि पुरोगामी विचार कुठे होते असा पलटवार अजित पवारांनी विरोधकांवर केला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी हे भाष्य केले.
महायुतीकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
यावर अजितदादांनी म्हटलं की, आमच्या तिन्ही पक्षाचं सर्वात पहिलं प्राधान्य हे बहुमत मिळवणं हे आहे. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही विचार करू परंतु मुख्यमंत्री महायुतीचा असेल हे नक्की. इतक्या लवकर आम्ही या गोष्टींचा निर्णय कसा करू शकतो, या गोष्टी निवडणुकीपूर्वी निश्चित होत नाहीत. याआधी अनेक गोष्टीवर विचार करावा लागतो असं सांगत निवडणुकीच्या निकालानंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरवला जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.
बारामतीतून निवडणूक लढणार?
मी बारामतीत निवडणूक लढणार नाही असं कुठे बोलले नाही. जेव्हा मला पक्षातील कार्यकर्त्यांकडून जयला बारामतीहून विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणीवर प्रश्न विचारला गेला, तेव्हा मी सांगितले की, ही लोकशाही आहे. अशा मागण्या केल्या जाऊ शकतात. मी त्याठिकाणी ७-८ टर्म आमदार राहिलो आहे. तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या. कोण कुठून निवडणूक लढणार हे पार्टी ठरवेल. अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.
लोकसभेत निराशाजनक कामगिरी का?
लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून चुकीचा प्रचार करण्यात आला. अबकी बार ४०० पार हा नारा लोकांना आवडला नाही कारण लोकांना वाटलं की, ४०० जागा जिंकल्यानंतर एनडीए सरकार संविधान बदलणार, समान नागरिक संहिता लागू करणार, आरक्षण संपवणार या सर्व गोष्टींचा खूप परिणाम झाला. त्यासोबतच ४०० पार नारा आणि अभियानामुळे आमच्या पक्षातील कार्यकर्ते आपला विजय होतोय हे समजून चिंतामुक्त राहिले. निकाल जरी अपेक्षित नसला तरी आमच्या मतांच्या टक्केवारील फार अंतर राहिले नाही असं अजित पवारांनी सांगितले.