मुंबई : कोल्हापूरमध्ये फिरते खंडपीठ व्हावे, यासाठी संपावर जाणाऱ्या कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांच्या वकिलांनी यापुढे संपावर जाणार नाही, असे आश्वासन शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिले. उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापण्याचा निर्णय निवृत्तीपूर्वी घेऊ, असे आश्वासन मुख्य न्या. मोहीत शाह यांनी या वकिलांना दिले होते. मात्र, यावर निर्णय न घेताच न्या. शाह निवृत्त झाल्याने सहा जिल्ह्यांतील वकिलांनी एक दिवसाचा संप पुकारला, तसेच त्यांनी न्या. शाह यांची प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढली होती. या कृत्याची गांभीर्याने दखल घेत, न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने ‘सु-मोटो’ दाखल करून घेतले. गेल्या सुनावणीवेळी या वकिलांची खरडपट्टी काढत, बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या. वकिलांनी यापुढे पुन्हा संपावर जाणार नाही, अशी हमी खंडपीठाला दिली. मात्र, खंडपीठाने लेखी स्वरूपात हमी देण्याचे निर्देश वकिलांना दिले, तसेच बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाने संबंधित वकिलांविरुद्ध कारवाई करण्यासाठी ठराव संमत केल्याची माहिती खंडपीठाला दिली, तर खंडपीठाने बार कौन्सिलला वकिलांवर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती पुढील सुनावणीवेळी देण्याचे निर्देश दिले.
पुन्हा संपावर जाणार नाही
By admin | Published: October 10, 2015 1:51 AM