मुंबई - Prakash Ambedkar on Sanjay Raut ( Marathi News ) लोकसभा निवडणुका कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकतात अशावेळी महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसल्याचं समोर येत आहे. काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षात जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु मविआत वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार हेदेखील स्पष्ट नाही. त्यात प्रकाश आंबेडकरांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवरून मविआतील पक्षांमध्ये चलबिचल झाल्याचं दिसून येते.
महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक मागणी करण्यात आली. मविआतील पक्षांनी मतदारांना आश्वासित करावे की निवडणुकीनंतर आम्ही भाजपा किंवा आरएसएससोबत समझोता करणार नाही. तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रतिनिधींनी मौन बाळगलं, ते यावर काहीच बोलले नाहीत. केवळ जितेंद्र आव्हाडांनी लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे असं म्हटलं. मात्र त्याचवेळी बैठकीत उपस्थित असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उघडपणे लेखी लिहून देण्यास नकार दिला अशी माहिती आता समोर येत आहे.
मविआकडून विशेषत: संजय राऊत यांच्याकडून सातत्याने प्रकाश आंबेडकर हे देशाच्या संविधान, लोकशाहीच्या रक्षणासाठी आमच्यासोबत राहतील असा विश्वास व्यक्त करत आहेत. परंतु स्वत: राऊत यांनी निवडणुकीनंतर आपला पक्ष भाजपासोबत जाणार नाही असं लेखी लिहून देण्यास नकार दिल्याचं प्रकाश आंबेडकरांच्या पत्रातून समोर आलं आहे.
आव्हाडांना काय दिलं प्रत्युत्तर
आव्हाडांनी लिहिलेल्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांनीही पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. त्यात ते म्हणतात की, "जितेंद्र आव्हाड, आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत लिहिले आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही, असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की, पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. आपण या अगोदरही भाजपबरोबर समझोत्यामध्ये होता, आजही समझोत्यामध्ये आहात आणि यापुढे राहाल याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.