ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - मेट्रोसारखे प्रकल्प हे परराज्यातून येणा-या लोंढ्यांसाठी बांधले जात असून अशा प्रकल्पांसाठी मराठी माणसाला हात लावू देणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेना सत्तेत आहे की विरोधात आहे हेच कळत नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
मेट्रो ३ या प्रस्तावित प्रकल्पासाठी दादरमधील काही रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी या रहिवाशांची बाजू घेत पुन्हा एकदा मेट्रो ३ ला विरोध दर्शवला. राज ठाकरे म्हणाले, आरे, गिरगाव आणि आता दादर, मराठी माणूस आहे तिथेच प्रकल्प राबवले जात असून महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्यासाठी हा षडयंत्र रचला जात आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करु असे मुख्यमंत्री सांगत असले तरी त्यावर आमचा विश्वास नाही असेही त्यांनी नमूद केले. मुंबईकरांना अशा प्रकल्पांची गरज नाही असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने सुरु केलेले प्रकल्पच पुढे न्यायचे असतील तर भाजपा सत्तेवर का आली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.