तुमचे म्हणणे सेकंदभरही ऐकणार नाही; नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:40 AM2022-12-14T08:40:48+5:302022-12-14T08:41:12+5:30
मलिक यांची याचिका जेव्हा सुनावणीस आली तेव्हा न्या. कर्णिक यांच्या एकलपीठाने मलिक यांचे वकील अमित देसाई यांना विचारले की, या याचिकेवर इतक्या तत्काळ सुनावणी का घ्यावी?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित दहशतवादप्रकरणी आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. ‘तुम्हाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी तुमची बाजू एक सेकंदही ऐकणार नाही. अन्य याचिका प्रलंबित आहेत. तुम्हाला नंतर रुग्णालयातून सोडले तरी तुमच्यावर उपचार केले जात नाहीत, हे सिद्ध करावे लागेल. तेव्हाच मी तुमचे म्हणणे ऐकेन,’ असे न्या. मकरंद कर्णिक यांनी सांगितले.
मलिक यांची याचिका जेव्हा सुनावणीस आली तेव्हा न्या. कर्णिक यांच्या एकलपीठाने मलिक यांचे वकील अमित देसाई यांना विचारले की, या याचिकेवर इतक्या तत्काळ सुनावणी का घ्यावी? याबाबत माझे समाधान करा. ‘मी ही सवलत केवळ वैद्यकीय कारणासाठी देतो, तेसुद्धा वैद्यकीय उपचार उपलब्ध नसतील तरच ही सवलत मिळू शकते,’ असेही न्या. कर्णिक म्हणाले.
त्यावर ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, मे २०२२ पासून नवाब मलिक त्यांनीच निवडलेल्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याचा अर्थ याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही. काही दिवसांनी सुनावणी घेऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले.
मलिक यांची एकच किडनी व्यवस्थित असून त्यांच्या दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण करायचे आहे आणि कदाचित ईडी त्यांना रुग्णालयातून सोडण्यासाठी अर्ज करील.
मलिक यांच्या कुुटुंबीयांना किडनी प्रत्यारोपणासाठी प्रक्रिया सुरू करायची आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना भेटणे व त्यांच्याशी चर्चा करण्याची आवश्यकता भासेल, असे देसाई यांनी न्यायालयाला सांगितले.
त्यांना (मलिक) शस्त्रक्रिया करावी लागली किंंवा आणखी काही तर त्यास ईडी विरोध करणार नाही. जर आरोग्याशी निगडित काही असेल तर सिंग निश्चितच विरोध करणार नाहीत, असे म्हणत न्यायालयाने ईडीला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.