मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मुद्द्यावर आज सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन, सरकार मागणीवर कार्यवाही करत आहे. थोडा वेळ दिला पाहिजे. तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारा ठराव या बैठकीत एकमताने पारित करण्यात आला. याशिवाय, या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. तसेच, न्यायमूर्ती शिंदे समितीमध्ये जरांगे पाटील अथवा त्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येईल, असेही सांगितले. यावर, आपण सरकारी समितीमध्ये सहभागी होणार नाही. तसेच आंदोलनासंदर्भात आपण मंगळवारी दुपारी निर्णय घेऊ, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील - मनोज जरांगे म्हणाले, "आमचे कुणीही समितीमध्ये जाणार नाही. ना मी, ना आमच्यावतीने कुणी तज्ज्ञ अथवा महाराष्ट्रातील कुणी, आमच्या वतीने कुणीही जाणार नाही. सरकारनेच त्यांचे कुणी समितीत टाकायचे ते टाकावेत. आमच्या वतीने समितीत कुणीही जाणार नाही. तो मोहही आम्हाला नाही. आम्हाला एकच मोह आहे, तो म्हणजे, काहीही करा, पण मराठा समाजाला आणि त्या पोरांना आरक्षण द्या. एवढाच मोह आम्हाला आहे. समितीत जाण्याचा मोह आम्हाला नाही. त्यासंदर्भात आम्ही आमचे मत स्पष्ट केले आहे. त्यांनीच तज्ज्ञ टाकावेत आणि समाजाला न्याय द्यावा."
आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात बोलताना जरांगे म्हणाले, "अंतरवलीसह या आंदोलनात सर्वच खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. ते सर्व गुन्हे मागे घेण्यात आले असतील, तर आम्ही गावाच्या आणि मराठा समाजाच्या वतीने आम्ही कौतुक करतो आणि स्वागतही करतो."
...तर आम्ही दोन पावलं मागे येऊ -पुढे बोलताना जरांगे म्हणाले, "मी कुणालाही भीत नाही, मी केवळ माझ्या समाजाला भीतो. माझे गावकरी जे भावणिक झाले आहेत मी केवळ त्याला दबतोय. माझ्या माता माऊल्या सगळ्याच गेल्या दोन तासांपासून रडत आहेत, संपूर्ण गाव विनंती करत आहे की, किमान सलाईन तरी घ्या, थोडं पाणी तरी घ्या. ते थोडं माझ्या काळजाला लागतंय. ते माय-बाप आहेत म्हणल्यावर त्यांचे ऐकावे की नाही, या दुविधा मनःस्थितीत आहे. माझ्यात निर्णय घेण्याची क्षमताच राहिली नाही. ते रडले नसते, भावणिक झाले नसते, तर मी आणखीही ताठर राहिलो असतो. काय करावे, सुचत नाहीय. पण बघुया, त्यांच्याकडूनही येईलच ना कुणीतरी आम्हाला सांगायला की, कशासाठी वेळ हवा, का हवा, ते जबाबदारीने काम करणार आहेत का? आम्ही एक पाऊल मागे यायचं म्हणत आहेत, आम्ही दोन पावलं मागे येऊ. पण वेळ का आणि कशासाठी हवा हे आम्हाला कळायलाही हवे आणि तुम्ही खरोखरच करणार आहात का? हा महत्वाचा मुद्दा आहे."
आमच्यासाठी मुख्यविषय आरक्षण -"आमच्यासाठी मुख्यविषय आरक्षण आहे. त्यांनी आज झालेल्या विषयावर प्रत्यक्ष येऊन आमच्यासोबत चर्चा करावी. त्यांसा सांगावे की, आम्ही तुम्हाला टिकणारे आरक्षण एढ्या दिवसांत देणार, मी आणि माझा मराठी समाज मंगळवारी लगेच बैठक घेतो आणि त्यांना सांगतो. एक पाऊल काय आम्ही दोन पाऊले मागे येतो." एवढेच नाही, तर "आरक्षणानेच आमच्या वेदना कमी होतील. गोड बोलू आणि वेळ मारून नाही. त्याचे दुष्परिणाम वेगळे होतील. त्यामुळे खरे बोला. सरकार आले आणि खात्री पटली तर मंगळवारी दोन वाजता भूमिका स्पष्ट करणार," असेही जरांगे यांनी म्हटले आहे.