CM Devendra Fadnavis: बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मारहाण आणि वन्य प्राण्यांची शिकार करत दहशत माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या या आरोपीला आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून ताब्यात घेतलं आहे. तसंच त्याच्या घरावरही प्रशासनाकडून बुलडोजर चालवण्यात आला आहे. या कारवाईविषयी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत आम्ही कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, असं म्हणत चुकीचं काम करणाऱ्या प्रवृत्तींना इशारा दिला आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्यावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बोक्या असो, खोक्या असो नाही तर ठोक्या असो, आम्ही कोणालाही सोडणार नाही. सगळ्यांना ठोकणार."
दरम्यान, सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय समजला जातो. याच भोसले याच्यावर कठोर कारवाई करत कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
उत्तर प्रदेशात आवळल्या खोक्याचा मुसक्या
सतीश ऊर्फ खोक्या भोसले याच्याविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल होते. तो सहा दिवसांपासून फरार होता. छत्रपती संभाजीनगरहून तो ट्रॅव्हल्सने प्रयागराजला (उत्तर प्रदेश) गेला. तेथे लपण्याआधीच बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला बेड्या ठोकल्या. शुक्रवारी सकाळी त्याला बंदोबस्तात बीडला आणले जाणार आहे. घरावर बुलडोजर
भाजपचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर आज वनविभागाने बुलडोजर चालवला. शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जमीन आहे. याच जमिनीवर वैदू वस्ती वसलेली होती. तिथे सतीश भोसलेने घर बांधलेलं होतं. ग्लास हाऊस असे या घराचं नाव होतं, हे घर अनधिकृत असल्याने वनविभागाने गुरूवारी बुलडोजरने जमीनदोस्त केले.