पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 01:19 PM2023-03-24T13:19:45+5:302023-03-24T13:20:55+5:30

आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला बोलू शकत नाही असा घेऊ नका असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला आहे.

will not tolerate PM Narendra Modi insults; CM Eknath Shinde Target Oppositions in Vidhan Sabha | पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले

पंतप्रधान मोदींचा अपमान सहन करणार नाही; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे कडाडले

googlenewsNext

मुंबई - राहुल गांधी यांच्या विधानावरून गेल्या २ दिवसांपासून विधिमंडळात गदारोळ सुरू आहे. राहुल गांधींविरोधात सत्ताधारी भाजपाने सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. या सर्व गोंधळात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही अशा शब्दात विरोधकांना इशारा दिला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह विधान करणारे हा देशाचा अपमान आहे. गेले ८ महिने मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून अपमान करणारे, खोके, गद्दार, मिंदे, चोर म्हणणे, गद्दार म्हणणे हे कुठल्या आचारसंहितेत बसतं? राहुल गांधी यांना जोडे मारण्याचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु सावरकरांचे वारंवार अपमान करणे हेदेखील देशद्रोहाचं काम आहे. जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा आपल्याकडे तीन बोटे असतात. त्यामुळे सभागृहाचं पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. या सभागृहात अनेक मोठी माणसे सदस्य होऊन गेलीत. सभागृह असो वा विधिमंडळ परिसरात सर्वांनीच कुठेही पावित्र्य भंग होणार नाही असं वागले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तसेच इतरांबद्दल जेव्हा असे शब्द वापरले जातात तेव्हाही विरोधकांनी भूमिका घेतली पाहिजे. आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला बोलू शकत नाही असा घेऊ नका. या देशाचा मान जगभरात पोहचवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. मी वैयक्तिक व्यक्ती म्हणून बोलत नाही. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आम्ही काय या देशाची जनताही सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. 

दरम्यान, तुमचे नेते या देशात लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतात. वस्तूस्थिती लोकांपर्यंत पोहचली पाहिजे म्हणून मी बोलतो. लोकशाही धोक्यात होती मग भारत जोडो यात्रा कशी काढली? आम्ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मानतो. त्यांचा मान राखतो. पण तुम्ही देशाच्या पंतप्रधानांबाबत बोलत असाल तर बिल्कुल आम्ही सहन करणार नाही. तुम्ही बाहेर जाऊन देशाचा अपमान करणार असाल तर ते कोण खपवून घेणार? यापुढे बोलताना सगळ्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे. सभागृहाचा मान राखलाच पाहिजे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

Web Title: will not tolerate PM Narendra Modi insults; CM Eknath Shinde Target Oppositions in Vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.