पुन्हा लॉकडाऊन होणार?; ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 04:17 PM2020-11-23T16:17:40+5:302020-11-23T16:19:07+5:30
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ; दुसऱ्या लाटेची भीती
मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. दिवाळीत अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल जनतेला संबोधित केलं. लॉकडाऊन माझा आवडता विषय नाही. पुन्हा 'लॉकडाऊन'च्या दिशेनं जायचं नसेल तर वेळीच सावध व्हा, असं म्हणत ठाकरेंनी जनतेला खबरदारीचा इशारा दिला.
लॉकडाऊन काही माझा आवडता विषय नाही, पण...; मुख्यमंत्री ठाकरे स्पष्टच बोलले
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. 'मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे मुंबईत बाहेरुन येणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. परराज्यांमधून मुंबईत लोंढे येत असतात. सध्याच्या घडीला देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती बिघडू नये, यासाठी निर्बंध लादले गेले पाहिजेत,' असं वडेट्टीवार म्हणाले.
...म्हणून मी तुमच्यावर नाराज; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'
विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनबद्दलही महत्त्वाचे संकेत दिले. 'मुंबई, पुणे, नागपूर आणि काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुढील ८ दिवसांत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतील. पुढील काही दिवस दर दिवशी किती रुग्ण आढळून येतात, त्याचा आढावा घेतला जाईल. मागच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील,' असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी थेट लॉकडाऊनचा उल्लेख केलेला नसला, तरी मागच्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील, असं म्हणत रेल्वे, विमानं सेवा बंद करण्याचा उल्लेख केला.
...तर आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितला पुढचा धोका
मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल काय म्हणाले?
पुन्हा 'लॉकडाऊन'च्या दिशेनं जायचं नसेल तर वेळीच सावध व्हा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना खबरदारीचा इशाराच दिला. कोरोनाची लस अजून आलेली नाही. त्यामुळे कोरोना संपला असं समजू नका. गर्दी वाढली की कोरोना वाढणार. त्यामुळे उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. अनेक जण मास्क वापरत नाहीत. काही ठिकाणी विनाकारण गर्दी होतोना दिसत आहे. ही ढिलाई परवडणारी नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. 'गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. मात्र आपण ते अतिशय साधेपणानं साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याला तोड नाही. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचं सहकार्य मिळेल,' अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.