ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर यावं मात्र त्यांनी भाषण करू नये, अशी अट महंत नामदेवशास्त्री महाराज यांनी घातली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. काही दिवसांपासून भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरुन पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्यामध्ये जुंपली आहे. पंकजा मुंडे यांनी आपण भगवान गडावर जाणार असल्याची माहिती बुधवारी फेसबुकद्वारे दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना नामदेव शास्त्री यांनी ही अट घातली आहे.
'पंकजा मुंडेंनी सामान्य भक्ताप्रमाणे गडावर यावं, त्यांना कोणीही रोखणार नाही. मात्र हा धार्मिक ट्रस्ट आहे. ट्रस्टने निर्णय घेतल्याप्रमाणे इथे भाषण होणार नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंनी इथे भाषण करू नये, भगवान गड धार्मिक आहे, राजकीय नाही. तर गोपीनाथ गड हा राजकीय आहे, त्यांनी तिकडे भाषण करावे', असे नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. 12 डिसेंबरला मी गोपीनाथ गडावर जाहीर केले होते, की यावर्षीपासूनच भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही. मग आज हा प्रश्न का? गोपीनाथ मुंडेंना भगवानगडाने आधार दिला, ही चूक केली का गडाने? असं प्रश्न देखील नामदेवशास्त्री यांनी उपस्थित केला आहे.
आणखी बातम्या
दरम्यान, भगवानगडावरील दसरा मेळावा पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्येच झाला पाहिजे, नाही तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा वंजारी सेवा संघाच्या वतीनं देण्यात आला होता. तर दुसरीकडे पंकजा मुंडेचे येथे भाषण होणार नाही, अशी भूमिका गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी घेतली होती.