जमीर काझी - मुंबई: सचिन वाझे यांच्या अटकेचे पडसाद राज्याच्या राजकारणाबरोबरच पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणात उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणामुळे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अन्यत्र बदली हाेईल, अशी चर्चा गृह विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्याबाबत महाविकास आघाडीचे नेते लवकरच निर्णय घेणार आहेत, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत एकमत झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Will Police Commissioner Parambir Singh stay or go? Discussions among senior officials with the Home Department)
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यामागे वाझेंसाेबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडेही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. याची नैतिक जबाबदारी म्हणून आयुक्त परमबीर सिंग यांना बाजूला करावे, असे मत महाविकास आघाडीचे नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांतून व्यक्त केले जात आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला थोपविण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जाते.
त्यामुळे नव्या आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
गेल्या सव्वा वर्षापासून पाेलीस आयुक्तपदी कार्यरत असलेले परमबीर सिंग यांनी कोरोना काळातील परिस्थिती, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई अशी अनेक प्रकरणे व्यवस्थित हाताळल्याने राज्य सरकारची त्यांच्यावर मर्जी होती. मात्र, स्फोटक कार प्रकरणात सुरू असलेल्या गुंतागुंतीमुळे अखेर आयुक्तांना पदावरुन हटविले जाईल, अशी चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे.
‘एनआयए’चे संचालक मुंबईतस्फोटक कारच्या गुन्ह्यात वाझेंशिवाय त्यांना पाठीशी घालणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एनआयए चौकशी करणार आहे. त्यासाठी संचालक वाय. सी. मोदी हे सोमवारी मुंबईत आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना चाैकशीसाठी बाेलावण्यात येणार असल्याचे समजते.