ऐन लोकसभा निवडणुकीत राज्याचा सर्व्हे आला आहे. यामध्ये महायुतीला ४८ पैकी ३० आणि मविआला १८ जागांचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एकंदरीत भाजपा आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांनाच यात फायदा होताना दिसत असून काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादी गट व वंचित बहुजन आघाडी यांना फारसा फायदा होताना दिसत नाहीय.
गेल्या वेळी वंचित आघाडीने मते घेतल्याने काँग्रेसचे बरेचसे उमेदवार पडले होते, असा आरोप काँग्रेसने तर काँग्रेसने मते घेतल्याने आमचे उमेदवार पडले असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार केला होता. आताही तसाच फटका बसणार असल्याचे एबीपी सीव्होटर सर्व्हेतून दिसत आहे.
प्रकाश आंबेडकर यांना वंचित आघाडी महाविकास आघाडीपासून वेगळी लढल्याचा फटका बसताना दिसत आहे. सुरुवातीला वंचित मविआसोबत लढणार असल्याचे चित्र होते. मात्र, मविआचे नेते बैठकांना बोलवत नाहीत, विचारात घेत नाहीत असा आरोप वंचितने करत स्वतंत्र लढण्याची घोषणा केली होती. वंचितने अनेक जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. यामुळे मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपा-शिंदे शिवसेनेला होताना दिसत आहे.
अकोल्यामध्ये तिरंगी लढतीत भाजपाचे अनुप धोत्रे हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील आणि वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचा पराभव होईल असा अंदाज या ओपिनिअन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. अंतिम निकाल हा ४ जूनला लागणार असून तेव्हाच राज्यातील ४८ लढतींचे चित्र स्पष्ट होणार असले तरी मतदानापूर्वीच्या या ओपिनिअन पोलना देखील राजकारणात महत्व आहे.