मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांबरोबर 'परीक्षा पे चर्चा 2020' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर 'परीक्षांवर चर्चा' करणाऱ्या पंतप्रधानांनी रोजगारावर सुद्धा चर्चा करावी' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे झालेल्या ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसं राहावं याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहता पंतप्रधान मोदी आता तरुणांच्या रोजगारासंबंधात चर्चा कधी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असल्याचा टोला राष्ट्रवादीने मोदींना लगावला आहे.
दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे केलेले सगळे दावे फोल ठरले. प्रत्यक्षात, फक्त चार लाख युवकांना रोजगार मिळाला. तरूणांना पकोडे तळण्याचा अजब सल्ला देण्यात आला. देशात बेरोजगारी लक्षणीयरित्या वाढली आहे. आहेत तेच रोजगार जात आहेत. त्यामुळे सुशिक्षित तरूणांना रोजगार मिळेल का याची शाश्वती नसल्याने रोजगारनिर्मिती संबंधी ठोस पावले उचलून मोदींनी तरूणांशी संवाद साधणे अपेक्षित असल्याची मागणी सुद्धा राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे.