पुणे : दिल्लीमध्ये होत असलेल्या आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे संमेलनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची यापूर्वीच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्घाटन कोण करणार, याविषयी सर्वांना उत्सुकता होती.
संमेलन दिल्लीत होत असल्याने संयोजक प्रधानमंत्री यांना बोलावतील, अशीच आशा सर्वांना होती. त्यानुसार संयोजक सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संमेलनाचे उदघाटन करावे, अशी विनंती केली आहे.
जर प्रधानमंत्र्यांनी ही विनंती मान्य केली, तर दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात एकाच मंचावर नरेंद्र मोदी आणि शरद पवार येतील. त्यामुळे संमेलनाचे उद्घाटन चांगलेच गाजू शकते. आता प्रधानमंत्री ही विनंती मान्य करतील का? याविषयीची उत्सुकता मराठी जणांना लागून राहिली आहे.