भंडारा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भंडाऱ्यातील रुग्णालयाची पाहणी केली. रुग्णालयात लागलेल्या आगीत १० चिमुरड्या बालकांचा मृत्यू झाला. त्या बालकांच्या कुटुंबांचं मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केलं. भंडाऱ्यातल्या घटनेची चौकशी करण्यात येईल. कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही. पण दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरेंनी रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर सांगितलं.'दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या पालकांना भेटलो. त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. कारण जीव गेले आहेत. कितीही सांत्वन केलं तरीही ते परत आणता येणार नाहीत. दुर्घटनेनंतर जे होतं, ते आधी का होत नाही असा प्रश्न आता विचारला आहे. कोरोना संकट असल्यानं इतर गोष्टींकडे दुर्लक्ष झालं आहे का, याचीही चौकशी केली जाईल. हा प्रकार अचानक घडला की वारंवार तक्रारी येत असतानाही अनास्थेमुळे हा प्रकार घडला, त्याचीही चौकशी होईल,' असं मुख्यमंत्री म्हणाले.'दुर्घटना प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करताना कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही. पण दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुटणार नाही. या समितीची समितीची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारीदेखील या समितीत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते मार्गदर्शक सूचना घालून देतील. भंडारा रुग्णालयातील घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,' अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
Bhandara Fire: कोणालाही मुद्दाम आरोपी करणार नाही; पण दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री
By कुणाल गवाणकर | Published: January 10, 2021 3:00 PM