मुंबई : ‘मुंबईचे पाटणा झाले,’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह पाटण्याचाही अपमान केला आहे. मुंबई आणि पाटण्याची तुलना करा, तशी ती झालीच तर मी राजकारण सोडेन, पण मुंबईचे पाटणा ठरले नाही तर तुम्ही मुंबई सोडा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलुंड येथील प्रचारसभेत शिवसेना आणि मुंबई महापालिकेच्या कारभार टीका केली होती. केंद्राच्या अहवालात मुंबई क्रमांकावर नसून, तिसऱ्या क्रमांकावर आहे. सल्लागारांनी अर्धवट माहिती दिल्याने, उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला उद्धव यांनी कांदिवली येथील सभेत चोख प्रत्युत्तर दिले. मुंबई महापालिका पारदर्शकतेत देशात अव्वलच आहे. तसा अहवाल केंद्र सरकारनेच दिला आहे. केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवे बसली आहेत का, असा प्रश्न विचारतानाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचीच अर्धवटराव अशी संभावना केली. या अहवालात मुख्यमंत्र्यांचे नागपूर कुठे आहे, असा सवालही उद्धव यांनी केला. ‘मुख्यमंत्री हे उपरवाल्याच्या मर्जीतले आहेत. मुंबई जिंका अशा सूचना त्यांना वरून देण्यात येतात. योग्यता नसणाऱ्यांशी लढतो आहे, याची लाज वाटते,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘मुख्यमंत्री फडणवीस घसा बसेपर्यंत ओरडतात. घसा बसल्यावर मुंबई महानगरपालिकेचेच पाणी पितात. जे घसा बसल्यानंतर मुंबई महापालिकेचेच पाणी पितात, ते काय आम्हाला पाणी पाजणार, असा सवालदेखील उद्धव ठाकरे यांनी या वेळी उपस्थित केला. आमच्या जाहीरनाम्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आहे. मात्र, भाजपाला जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर छापावा लागतो. कारण जाहीरमान्यावर छायाचित्र असलेल्या पंतप्रधान मोदींची जनमानसातील विश्वासार्हता संपलेली आहे. मुख्यमंत्री कल्याण-डोंबिवलीला साडेसहा हजार कोटी रुपये देणार आहेत. त्यातील एक रुपयादेखील मिळालेला नाही. अशी खोटी माणसे २५ वर्षे जपली, याची खंत वाटते,’ असे म्हणत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली.
...तर राजकारण सोडेन
By admin | Published: February 09, 2017 5:35 AM