राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्यावरून राज्यात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरे यांना दिल्लीत सोडून काल रात्रीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात परतले होते. राज ठाकरे व अमित ठाकरे दिल्लीतच थांबले होते. साडेबाराच्या सुमारास राज ठाकरे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सुमारे अर्धा तास चर्चा करून राज हे पुन्हा माघारी फिरले आहेत.
राज थांबलेल्या हॉटेलवर विनोद तावडे पोहोचले होते. काही वेळ या दोघांमध्ये चर्चा झाली आणि शाह यांना भेटण्यासाठी निघाले. इकडे राज्यातही मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. आधीच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना राज आले तर त्यांच्यासाठी जागा सोडाव्या लागणार आहेत. असे झाल्यास कोणाच्या जागा राज यांच्या मनसेला द्यायच्या असा प्रश्न महायुतीसमोर आहे.
भाजपाने आधीच २० जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. राहिलेल्या २८ जागांमध्येही काही जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी, शिवसेनेला मनसेसाठी एखादी जागा सोडावी लागू शकते, अशी शक्यता आहे. राज ठाकरे आल्याने उद्धव ठाकरेंच्या गटाला लढत देणे भाजपाला सोपे जाणार आहे. यामुळे मुंबईत भाजपाला आपले इप्सित साध्य करणे कठीण जाणार नाही. शिवाय येत्या काळात विधानसभा आणि पालिकांच्या निवडणुका आहेत त्यातही त्यांचा फायदा उठविता येणार आहे.
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. राज ठाकरे महाराष्ट्रात येऊन आपली भुमिका मांडण्याची शक्यता आहे. मोदी सरकारवर उमेदवार उतरविलेले नसले तरी आपल्या सभा आयोजित करून भाषणांमधून टीका करणारे राज ठाकरे जर महायुतीत आले तर त्यांचा वापर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसविरोधात करून घेतला जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचे लाव रे तो व्हिडीओचे शस्त्र भाजप विरोधकांविरोधात वापरण्याची शक्यता आहे. आता राज ठाकरे काय निर्णय घेतात, महायुतीत जातात की मोदी सरकारविरोधात बोलतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.