Raj Thackeray Uddhav Thackeray Sharad Pawar news: हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरेंनीउद्धव ठाकरेंसोबत काम करण्याचे संकेत दिले. त्यावर उद्धव ठाकरेंनीही लागलीच टाळी दिली. या संदर्भात पुढे काही राजकीय घडामोडी घडल्या नसल्या तरी राजकीय वर्तुळात चर्चा मात्र जोरात सुरू झाल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बारामतीमध्ये शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांबद्दल विचारण्यात आले. त्यांनी याबद्दल भूमिका मांडली. मुंबईच्या निवडणुका जवळ येताना दिसत आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. याबद्दल शरद पवारांना विचारण्यात आले.
शरद पवार म्हणाले, "हा त्यांचा कौटुंबीक प्रश्न आहे. याची माहिती माझ्याकडे नाही. मी काही त्यांच्याशी बोललो नाही. आणि त्यावर कसं मी भाष्य करू?"
पवार कुटुंबात एकोपा वाढतोय, शरद पवार म्हणाले...
पवार कुटुंबामध्येही एकोपा वाढताना दिसत आहे, याकडेही पवारांचे लक्ष वेधण्यात आले.
शरद पवार म्हणाले, "जनतेच्या कामासाठी एकत्र यावं लागतं. आता हा तुम्ही जो प्रश्न करता की उसाच्या संबंधी. उत्पादन वाढीचा. त्यावर आम्ही बसलो होतो. आम्ही काम करून उपयोग नाही. यात सरकार आलं पाहिजे. सरकारच्या प्रतिनिधींशी बोलणं, यात काहीही चुकीचे नाही."
हिंदी सक्तीचा मुद्दा अन् राज ठाकरे-उद्धव ठाकरेंचे एकत्र येण्याबद्दल विधान
महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत काम करण्यात काही अडचण नसल्याचे म्हटले होते. महाराष्ट्रातील या मुद्द्यांपेक्षा आमच्यातील वाद खूप छोटे आहेत, असेही ते म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येणार का? या चर्चेला जास्त हवा मिळाली.