- रवींद्र देशमुखमुंबई - जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदार संघातील लढत 2014 मध्ये एकतर्फी झाली होती. आमदार राजेश टोपे यांनी सहज विजय मिळवत जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा उंचावला होता. यावेळी मात्र राजेश टोपे यांना शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. उढाण यांच्या मदतीला भाजपही होते. परंतु, राजेश टोपे यांचे मायक्रो मॅनेजमेंट पुन्हा एकदा शिवसेनेला भारी पडत की काय, अशी स्थिती मतदार संघात आहे.
शिक्षण संस्था, साखर कारखाने आणि सुतगिरणीच्या माध्यमातून मतदार संघात केलेलं संघटन टोपे यांना फायदेशीर ठरत आहे. कार्यकर्त्यांसह प्रचार कार्यात टोपे यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे सहाजिकच टोपे यांचे पारडे जड झाले आहे. दुसरीकडे हिकमत उढाण यांची मदार सर्वस्वी शिवसैनिकांवर होती. शिवसैनिकांनी देखील मतदार संघ पिंजून काढला आहे. पण जबाबदारीने काम करणाऱ्या शिवसैनिकांची संख्या किती हाही महत्त्वाचा विषय ठरणार आहे.
निवडणूक म्हटलं की, मतदानाचा आणि त्याआधीचा एक दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. संपूर्ण प्रचारात जे साध्य होत नाही, ते या दोन दिवसांत होते. यामध्ये मतदारांना मतदानासाठी घरातून बाहेर काढण्यासापासून बाहेरगावी असलेले मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यापर्यंतच्या गोष्टीला महत्त्व असते. यामध्ये टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी चोख भूमिका बजावल्याचे दिसून आले.
बाहेर गावाच्या मतदारांशी संपर्क करून लोकशाही मजबूत व्हावी, या उद्देशाने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम टोपे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. लढत चुरशीची होणार असल्यामुळे एक-एक मतांचा विचार होऊ शकतो. अशा वेळी टोपे यांचे अखेरच्या दिवशीचे मॅनेजमेंट गेमचेंजर ठरू शकते.