विश्वास पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चार प्रमुख पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न संभाजीराजे छत्रपती करीत असून, असा पाठिंबा मिळाल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे. संभाजीराजे यांच्या उमेदवारीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. पवार यांनी मनात आणले तर ते महाविकास आघाडीला संभाजीराजे यांच्या पाठीशी उभे करू शकतात.
भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी व शिवसेनेचे एक अशा पाच उमेदवारांचा विजय नक्की आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील तीन पक्षांची मिळून २५ मते जादाची आहेत. त्यांना लहान पक्ष व अपक्ष मिळून १६ आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपकडे स्वत:ची २२ आणि अपक्षांची सात अशी २९ मते जादाची आहेत. महाविकास आघाडीने पाठिंबा दिला व भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नाही आणि एखादा ताकदवान अपक्ष रिंगणात उतरला नाही, तर संभाजीराजे यांना अडचण येणार नाही. उरणचे भाजप समर्थित अपक्ष आमदार महेश बालदी यांनी संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर केला.
शिवसेना घेणार निर्णय : अजित पवार
“दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विनंतीवरून शिवसेनेने मदत केली होती. यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिन्ही पक्षांकडील अतिरिक्त मते लक्षात घेऊन कुणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेतील,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.