राणे कुटुंब भाजपा सोडणार? खुद्द नारायण राणेंनी दिलं कार्यकर्ता मेळाव्यात उत्तर, म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 04:31 PM2019-12-16T16:31:33+5:302019-12-16T16:32:35+5:30
नितेश राणे यांच्याविरोधात भाजपा-शिवसेनेची युती असतानाही शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली होती
सिंधुदुर्ग - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातलं समीकरण बदललं असून सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश आणि निलेश यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडूनही आले. मात्र भाजपाची सत्ता येईल असं वाटत असताना राज्यात सत्तेचं वेगळेच नाट्य पाहायला मिळालं.
यातच नारायण राणे आणि कुटुंब भाजपात राहणार का? अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावर खुद्द नारायण राणे यांनी भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाष्य केलं आहे. मी आता अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसून यापूर्वी दोन पक्ष बदलले, आता पक्ष बदलणार नाही. मी आणि माझे दोन्ही मुलं शेवटपर्यंत भाजपामध्येच राहतील असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
नारायण राणे यांनी शिवसेनेशी फारकत घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस सरकारच्या काळात ते मंत्रीदेखील होते. मात्र त्यानंतर काँग्रेस नेतृत्वावर टीका करत नारायण राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नारायण राणे यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशही मिळविले. नारायण राणे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात नारायण राणेंनी भाजपात प्रवेश केला. मात्र शिवसेनेने राणेंच्या भाजपा प्रवेशाला कडाडून विरोध केला होता.
नारायण राणे यांनी निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या कोणत्याही टीकेवर उत्तर न देण्याचं ठरविले होते. नितेश राणे यांच्याविरोधात भाजपा-शिवसेनेची युती असतानाही शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली होती. नितेश राणेंचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने अथक प्रयत्न केले मात्र यश मिळाले नाही. नितेश राणे कणकवली मतदारसंघातून निवडून आले मात्र या निमित्ताने नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष लोकांना पाहायला मिळाला होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतल्याने नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे भविष्यात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी तीव्र होणार यात काही शंका नाही.