मुंबई : नगरपालिका कर्मचा-यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचे परिपत्रक जाहीर झाल्यानंतरही महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेला अद्याप तीन शासन निर्णयांच्या परिपत्रकाची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत घेतलेल्या तीन निर्णयांचे अद्याप परिपत्रक निघालेले नाही. त्यामुळे रोजंदारी कामगारांना कायम कधी करणार, हे अनुत्तरित आहे. त्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. रोजंदारी कर्मचारी, नगरपालिका कर्मचा-यांचे समावेशन आणि सफाई व मुकादमाची पदे या तीन प्रमुख निर्णयांचे परिपत्रक कधी निघणार, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी सांगितले की, नगरपालिका कर्मचा-यांना १ आॅक्टोबर २००६ सालापासून लागू केलेल्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे परिपत्रक काढत शासनाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र थकबाकीपासून वंचित ठेवत शासनाने या भेटीत मिठाचा खडा टाकलेला आहे. अशा परिस्थितीतही शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कर्मचारी व संघटनेने स्वागत केले आहे. मात्र नगरपालिका कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आणखी तीन निर्णय घेतलेले होते. त्यात नगरपालिकांतील रोजंदारी कर्मचा-यांना कायम सेवेत घेणे, नवनिर्मित नगरपंचायतीमधील कर्मचा-यांच्या समावेशनातील तांत्रिक अडचणी व अटी शिथिल करून त्यांचे समावेशन करणे आणि नगरपंचायतीमध्ये सफाई कामगार व मुकादमांची पदे निर्माण करणे यांवर निर्णय घेण्यात आला होता. मात्र या तीनही प्रमुख निर्णयांचे परिपत्रक अद्याप जारी झालेले नाही. ते लवकर जारी करण्याची कृती समितीची मागणी आहे.
रोजंदारी कर्मचारी कायम कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 6:24 AM