मुंबई : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत हेसुद्धा बंडखोरी करत गुवाहाटी गाठणार असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. अखेर स्वत: सुनील राऊत यांनी सोमवारी त्याचे खंडन करत अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण बंडखोरी करणार नसल्याचे स्पष्ट केले. राऊत म्हणाले की, मी कशाला गुवाहाटीला जाऊ. जायचे असेल तर मी गोव्याला जाईन. तिथेही निसर्ग आहे. गुवाहाटीत गद्दारांची तोंडे पाहण्यापेक्षा मी गोव्याला जाईन. बाकी, या बातम्या केवळ जाणून-बुजून पसरवल्या जात आहेत. सुनील राऊत हा बाळासाहेबांचा सैनिक आहे. आम्हाला कापले तरी शिवसेना आणि बाळासाहेब असतील. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि शिवसेनेतच राहणार आहोत. राऊत म्हणाले की, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे आमचे कुटुंबीय आहेत. जे काही राहिले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राज्यात वाढवू. अनेक मोठे नेते ज्यावेळी पक्ष सोडून गेले, त्यावेळी आम्ही शिवसेना मोठ्या संख्येने वाढवली. आमचा विश्वास फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. माझ्या मतदारसंघात दोन्ही वर्षांत मी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत आहे. शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना फंड मिळाला आहे. हा फंड महाविकास आघाडीमुळेच मिळाला आहे, असेही ते म्हणाले.
अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेनेत राहणार, उलटसुलट चर्चांवर सुनील राऊत यांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 8:41 AM