मुंबई : एसटी महामंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना ५00 रुपये भरुन दहा महिन्यांसाठी मोफत प्रवासाचा पास देण्याचे आश्वासन महामंडळाकडून नुकतेच देण्यात आले होते. मात्र हा पास देण्यावरुन सध्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नकारात्मक भूमिका जरी असली तरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून यावर सकारात्मक भूमिका घेण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय १४ आॅगस्टला महामंडळाच्या बोर्डाच्या बैठकीत होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षातून एकदा दोन महिन्यांकरीता कमी गर्दीच्या हंगामात मोफत प्रवासाचा पास दिला जात होता. उर्वरीत दहा महिन्यांसाठी त्याचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे किमान ५00 रुपये भरुन दहा महिन्यांसाठी मोफत प्रवासाचा पास मिळावा, अशी मागणी एसटीच्या निवृत्त कर्मचारी संघटनेची होती. १४ जुलै रोजी परिवहन मंत्री मधुकरराव चौधरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत १५ आॅगस्टपूर्वी हा निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ५५ हजार निवृत्त कर्मचारी असल्याचे सांगत महामंडळावर वर्षाला ४९ कोटी रुपयांचा बोजा पडेल, अशा प्रकारची आकडेवारी एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आली होती. मात्र एसटीतील सर्वच संघटनांकडून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मोफत पासासाठी दबाव येत असून यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी वारंवार मागणीही केली जात आहे. १४ आॅगस्ट रोजी एसटी महामंडळाची बॉर्डाची बैठक होणार असून या बैठकीत मोफत पासावर चर्चा केली जाणार आहे. त्यावरच हा निर्णय होईल, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
एसटी निवृत्त कर्मचाऱ्यांचा मोफत पासाचा प्रश्न सुटणार?
By admin | Published: August 11, 2014 3:13 AM